- लिकेश अंबादे
गडचिरोली : गावाकडील अनेक तरुण काम न करता दिवसभर इकडेतिकडे बसून वेळ वाया घालताना दिसतात; परंतु कष्ट करून आपली आर्थिक स्थिती मजबूत हाेईल, याकडे काणाडाेळा करतात. अशा तरुणाईला लाजवेल असेच बांबूपासून टाेपल्या विणण्याचे काम काेटरा गावातील नव्वद वर्षीय सुखीराम तिरपुडे करत असून ते उतरत्या वयातही जाेमाने काम करीत आहेत. त्यांची जिद्द व मेहनत समाजापुढे आदर्शवत ठरत आहे.
सुखीराम तिरपुडे हे बांबूपासून टाेपल्या तयार करून स्वत: पैसे कमवून आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करतात. प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासह ते काही पैसे कुटुंबालाही देत असल्याचे आश्रमशाळेत कार्यरत शिक्षक रमेश सहारे यांनी सांगितले. सुखीराम यांना शिवचरण नावाचा मुलगा आहे, तर बिंदाबाई नावाची मुलगी आहे. बिंदाबाई ही छत्तीसगड राज्यात राहते. सुखीराम तिरपुडे हे मुलगा शिवचरणकडे राहतात.
बांबूच्या वस्तू विक्रीमधून आर्थिक आधार
सुखीराम यांना बांबूपासून टोपल्या विणणे, सूप बनवणे तसेच बांबूपासून विविध वस्तू बनवण्याची कला अवगत आहे; परंतु वाढत्या वयामुळे ती कामे जाेमाने करणे आता शक्य होत नाही. तरीही निसर्गात उपलब्ध संसाधनांचा वापर करून आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी ते जी धडपड करत आहे, ती धडपड युवांसाठी प्रेरणादायी आहे.
जंगलातून गाेळा करतात वनाेपजकोरची तालुक्यातील अतिदुर्गम कोटरा येथील सुखीराम तुक्या तिरपुडे यांनी वयाची नव्वदी ओलांडली आहे. काेटरा येथील अनुदानित मांसाहेब आश्रम शाळेच्या पटांगणात एक हिरड्याचे झाड आहे. त्या झाडाखालील हिरडे तब्बल एक आठवडा सुखीराम तिरपुडे यांनी संकलित केले. धड चालताही येत नसताना ते हिरडे संकलित करीत हाेते. धड चालता येत नसतानाही त्यांनी आठवडाभर १२ ते १३ किलाे हिरडे वेचून १५० रुपये कमाई केली. यावरून त्यांची श्रम करण्याची वृत्ती दिसून आली.