- राजेश बारसागडे
Vegetable Farming :चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) नागभीड तालुका हा धान पिकाचा (Paddy Cultivation) पट्टा असल्याने धान पिकाव्यतिरिक्त इतर पिके घ्यायची कुणी हिंमत करत नाही आणि पोषक वातावरण नाही, असा कांगावा करत अनेक शेतकरी केवळ धान पीक घेऊन गप्प बसतात. मग निसर्गाची अवकृपा झाली आणि धान पिकाचे नुकसान झाले की, नशिबाला कोसत बसण्याची वेळ येते. मात्र सुनील सुकारे व त्यांचा मुलगा धीरज सुनील सुकारे हे पिता-पुत्र शेतकरी याला अपवाद ठरले आहेत.
शेतकरी सुकारे हे पाच एकर धानाच्या शेतीमध्ये बारमाही विविध भाजीपाल्यांची लागवड (Vegetable Farming) करत आहेत. यातून वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन ते घेतात. शिवाय मत्स्यव्यवसाय (fish Farming) प्रशिक्षित असलेला त्यांचा मुलगाही शेतातच मत्स्य टाक्यांच्या माध्यमातून माशांचे उत्पादन घेत आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले गिरगाव हे त्यांचे गाव आहे. कृषी क्षेत्रात विकसित झालेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून व योग्य नियोजन करून वेगवेगळे पीक घेतले तर उत्पादन नक्कीच होते, हे या शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
अलीकडे पूर्वीसारखा निसर्गाचा समतोल राहिला नसून नैसर्गिक बदलांमुळे ऋतूंतही फरक पडलेला आहे आणि निसर्गाचा लहरीपणाही वाढलेला आहे. त्यामुळे दरवर्षी पाऊस अगदी वेळेवर आणि समाधानकारक पडेल, हे तंतोतंत सांगता येणे आता कठीण झाले आहे. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून पिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रचंड कष्ट उपसत शेतात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयोग सुनील सुकारे व धीरज सुकारे या पिता-पुत्रानी अवलंबला.
भाजीपाला शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर
केवळ त्यांच्या पाच एकर शेतात या शेतकऱ्याने धान पिकाव्यतिरिक्त चवळी शेंगा, कारली, मेथी, पालक, दोडके, कोथिंबीर, भेंडी असा विविध प्रकारचा भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. यासाठी ते केवळ सेंद्रिय खताचाच वापर करतात. त्यांचे हे दूसरे वर्ष आहे. यावर्षी केवळ दीड एकर शेतात त्यांनी चवळी शेंग लावली आणि एकाच पिकाचे त्यांना तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. यासाठी त्यांना एक लाख रुपये एवढा खर्च आला. त्यांचा भाजीपालाही शेतातूनच ठोकीने विकला जातो. त्यांच्याकडे सिंचनाच्या सुविधेपैकी एक विहीर आहे. या विहिरीवर सौर पॅनेल बसवून ते वर्षभर विविध भाजीपाल्यांचे उत्पादन घेत असतात.
सोबतीला शेळी, कुक्कुटपालन विक्री
शिवाय त्यांचा मुलगा धीरज हा सुद्धा भक्कमपणे त्यांच्या सोबतीला असतो. शेतातच मत्स्य टाका बनवून वर्षाला ५० ते ६० हजारांचे उत्पादन घेत असल्याचे धीरजने सांगितले. शेतातच त्यांनी टिनपत्रा टाकून फार्म हाऊस सुरू केले असल्याने शेतीव्यतिरिक्त ते शेळीपालन, गावठी कोंबड्यांची विक्री करून उत्पादन घेत असतात. यासाठी अजूनपर्यंत त्यांनी शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही. स्वबळावर त्यांनी ही बारमाही शेती अवघ्या पाच एकर शेतात फुलवली आहे.