मुखरू बागडे
भंडारा : नुसती धानाची किंवा भाजीपाल्याचीशेती शेतकऱ्यांना तारणार नाही तर वर्षभराच्या उत्पन्नाकरिता फळबागायत सुद्धा महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी किमान एका एकरात बांधावर पाच फणसाची झाडे लावावी. जेणेकरून वर्षातून एकदा नगदी उत्पन्न खर्चाविना शेतकऱ्यांना मिळते. एक झाड किमान पाच हजार रुपये नक्कीच उत्पन्न देते. आंब्याची, चिकूची व फणसाची झाडे शेतकऱ्यांनी लागवड करत उत्पन्नात भर पाडणारी ठरत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील पालांदूर परिसरातील मन्हेगाव येथील भगवान नकटू शेंडे व त्यांच्या बंधूंनी शेतावर वडिलोपार्जित फणसाचे झाड जोपासले आहे. बारमाही सिंचन असल्याने शेतात फणस व आंब्याची झाडे लावली आहेत. फणसाचे झाड एवढे लदबदलेले आहे की, बघताक्षणी आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर उमटतात. झाडाखाली फळाला न्याहरतचं राहावे, अशी इच्छा आपसूकच मनात तयार होते. झुळझुळ वाहणारे पाटाचे पाणी व त्यात बांधाच्या कडेला फळांनी भरलेले फणसाचे झाड यामुळे शेतकऱ्याच्या वैभवतेचे प्रतीक जाणवते.
बाजारात ४० रुपये किलो !
पालांदूर येथील आठवडी बाजारात फणस चाळीस रुपये किलो दराने विकला जातो. किमान २० ते २५ तरुण पिढीतले व्यापारी फणसाचा व्यापार करतात. चुलबंद खोऱ्यातील वाकल, मन्हेगाव, पाथरी, नव्हा आदी गावांतील शेत- कांकडे फणसांच्या झाडाची लागवड केली आहे. वर्षातून येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना नगदी रुपयांचे खर्चाविना उत्पन्न मिळते. भंडारा शहरात हाच फणस ५० रुपये किलो दराने मिळत आहे.
शेतातूनच होते फणसाची विक्री
भंडारा जिल्ह्यात फणसाच्या विक्रीला मोठी गती आहे. व्यापारी थेट शेतावरच पोहोचून झाडावर लागलेल्या फणसाची संख्या मोजून किंमत ठरवतात. त्यामुळे शेतकऱ्याला वाहतुकीचा खर्च शून्य येतो. शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे नगदी रूपाने तेही थेट शेतातच मिळतात, हे विशेष! तसेच भाजीपाल्याच्या शेतीसोबतच फळबागायत महत्त्वाची व नफ्याची आहे. जिल्ह्यात स्थानिक ठिकाणी मागणी असलेल्या फळांची शेती करावी. बीटीबी येथे दरवर्षी फणस, सीताफळ, लिंब व आंबा यांना मोठी मागणी आहे. - बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जी मंडी, भंडारा.