नाशिक जिल्ह्यातील कॅलिफोर्निया म्ह्णून ओळखला जाणारा निफाड तालुका हा द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र मागील काही वर्षांपासून तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे. याच संकटावर मात करण्यासाठी निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील शेतकरी भारत बोलिज यांनी फळशेतीचा आगळा वेगळा प्रयोग साकारला आहे. नाशिकच्या मातीत हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये उत्पादित होणाऱ्या सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. सफरचंदाबरोबरच बोलिज यांनी अडीच एकर शेतीत जवळपास चाळीस प्रकारच्या फळांची शेती फुलवली आहे.
पिंपळगाव बसवंत पासून अवघ्या आठ किलोमीटरवर पालखेड मिरचीचे हे गाव आहे. याच गावात भारत बोलिज कुटुंबासह राहतात. विशेष म्हणजे शिक्षणाचा पिंड असलेले बोलिज यांचं शिक्षण हे एमएसस्सी केमिस्ट्री झालेले असून ते सांगोला महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मात्र मध्यंतरी कोरोनाचे संकट आल्यानंतर त्यांच्या नोकरीवर गदा आली. त्यामुळे कोविडमध्ये घरची वाट धरावी लागली. मात्र घरची शेती असल्याने यापुढे शेतीतच काहीतरी नवं करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बोलिज यांनी 2020 साली पेरूची लागवड करत शेतीत श्रीगणेशा केला. काही काळ नोकरी करून पुन्हा पूर्णपणे शेतीत झोकून देण्याचा निर्णय घेतला.
एकीकडे शेतीत पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेरूनंतर हळूहळू एक एक फळ पिकांची लागवड करण्यास सुरवात केली. पेरूनंतर काश्मिरी रेड अँपल, वेलची केळ म्हणून ओळख असलेले देशी केळीची लागवड केली. असं करता करता जवळपास चाळीसहून अधिक प्रकारच्या फळांची लागवड शेतात केली. 2022 च्या सुमारास हिमालयीन शिमला ऍना या जातीच्या सफरचंदाच्या 30 रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वातावरण हे उष्ण आणि काहीसे दमट असते, मात्र अशा स्थितीतही सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सद्यास्थितीत बोलिज यांच्या अडीच एकर शेतीत चाळीस प्रकारची फळझाडे असून यात खजूर, सत्रांचे तीन प्रकार, मोसंबीचे पाच ते सहा प्रकार, ५ प्रकारचे नारळ, सीताफळ अशी एकाच ठिकाणी सगळीच फळे चाखायला मिळत आहेत.
फळबागेचे व्यवस्थापन कसं केले जाते?
दरम्यान भारत बोलिज हे स्वतः शिक्षित असल्याने त्यांनी शेतीचा पुरेपूर अभ्यास करून फळांची शेती फुलवली आहे. बोलिज यांच्याकडे गाई म्हशी असल्याने शेतीसाठी याच शेणखताचा वापर केला जात असल्याचे ते म्हणाले. शिवाय फळे आल्यानंतर कुठल्याही बाजारात जायची गरज पडत नाही. सर्व फळे दारासमोर विकली जात असतात. आजूबाजूची लोक मिठाई घेण्याऐवजी फळ घेऊन जातात. विशेष म्हणजे बोलिज यांनी आजपर्यंत कोणतेही फळ मार्केटला नेले नसल्याचे ते म्हणाले. तसेच कधी ऑनलाईन विक्रीची गरजही नाही, कारण घरासमोर अनेकजण येऊन खरेदी करत असल्याने इथल्या इथं ताजी फळे लोक घेऊन जात असल्याचे ते म्हणाले.
विविध फळशेतीचे कारण काय?
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अशावेळी बोलिज यांनी विविध फळांची शेती करण्याचा निर्णय का घेतला. यावर ते म्हणाले की, चाळीसहून अधिक प्रकारची फळशेती केली आहे. त्यामुळे सातत्याने उत्पादन सुरूच आहे. दुसरीकडे आपल्या भागात गेल्या काही वर्षात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत आहे. अशा स्थितीत केवळ एका पिकावर भागवून चालत नाही. ते पीक गेलं तर मोठं आर्थिक नुकसान होत. अशावेळी विविध फळांची शेती फायदेशीर ठरते. अवकाळी पाऊस झाला तर एक दोन पिकावर परिणाम होतो, त्यामुळे एका फळाचे नुकसान झाले तर दुसऱ्या फळातून उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे या प्रकारच्या फळशेतीमुळे पुढील दहा वर्ष शेतात कुठल्याही प्रकारची मशागत करावी लागणार नाही. त्यामुळे वेळही आणि खर्चही वाचणार असल्याचे बोलिज यांनी सांगितले.