गोंदिया : चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच महिला मर्यादित नसून त्या आता अबला नसून सबला झाल्या आहेत, याची प्रचिती कित्येक क्षेत्रातील उदाहरणांमधून दिसून येत आहे. फक्त त्यांना प्रोत्साहित करून हातभार लावण्याची गरज असते. महिला आर्थिक विकास महामंडळाने तिरोडा तालुक्यातील ३४ गावांतील महिलांनी चक्क दुग्ध क्रांती घडवून आणली असून तब्बल १६ लाख ७२ हजार ५६० लिटर दुधाची विक्री केली आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील महिला बचत गटातील सदस्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी दूध उत्पादनाचा जोड व्यवसाय (women's dairy farming) सुरू करण्यात आला आहे. यातून उत्पादित दुधाची विक्री अमूल कंपनीला करण्यात येत आहे. महिलांच्या परिश्रमाचे चीज होत असून सन २०२३-२४ या वर्षात १६ लक्ष ७२ हजार ५६० लिटर दूध विक्री करण्यात आली आहे. या दुधाला प्रति लिटर ४६ रुपये दर मिळाला असून याच दुधाला स्थानिक व्यापारी ३७० रुपयांपेक्षा कमी दर देत होते.
वर्षात 7.50 कोटींचे उत्पन्न
माविमद्वारा दूध विक्री सोबतच दूध उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. ज्या लाभार्थीकडे एक दुधाळू जनावर आहे त्यांना दुसरे जनावर खरेदीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. महिलांनी घेतलेल्या या परिश्रमाचे फलित त्यांना मिळत असून दूध विक्रीतून प्रत्येक पशुपालकाला ७० हजार ६५० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्व पशुपालकांनी या आर्थिक वर्षात सात कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे, दुधाला मिळालेल्या वाढीव दरामुळे स्थानिक व्यापायांनी सुद्धा दर वाढविले आहेत.
1.64 कोटींचे कर्ज वाटप
महिलांनी केलेल्या दूध विक्रीच्या जोडधंद्यातून येणारे उत्पन्न बघून आता अन्य महिलाही याकडे आकर्षित होत आहेत, या आर्थिक वर्षात ३२४ लाभार्थीनी एक कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज घेऊन ३२४ गाई - म्हशी खरेदी केल्या आहेत. सहा गावांत मुरघास बहुवार्षिक चारा लागवड करण्यात आली आहे. घरोघरी अझोला या संकल्पनेतून ९०० महिलांनी अझोला लागवड (Azolla Cultivation) केली आहे.
दूध शीतकरण केंद्राची उभारणी
प्रत्येक गावात दूध संकलन केंद्र (Milk Collection Centre ) स्थापन करण्यात आले आहे. त्या केंद्रांना प्रति लिटर एक रुपये कमिशन दिले आहे. सन २०२३-२५ या वर्षांत अदानी फाउंडेशनच्या सहकाबनि तिरोडा व गोंदिया तालुका मिळून ३७ दूध संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक कुटुचाला प्रति माह सरासरी सहा हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. या प्रकल्पाला जिल्हा नियोजन कार्यालयाद्वारे एक कोटी ६४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीतून ३५ हजार लिटरच्या दूध शीतकरण केंदाची उभारणी अतिम टप्प्यात आहे.