- गोपाल लाजूरकर
Sericulture Farming : घरातच पारंपरिक टसर रेशीम कोशनिर्मितीचा (Tasar Reshim Sheti) व्यवसाय. त्यामुळे धानाची शेती कसण्याकडे फारसे लक्ष घातले नाही. त्यातही धानाच्या शेतीत कष्ट अधिक नफा कमी, ही स्थिती असताना येनाच्या झाडावर रेशीम अळीचे अंडीपुंज बसवून त्याद्वारे रेशीम शेती कसणे हा चांगला पर्याय निवडला. याच शेतीतून अधिक उत्पादन कसे घेता येईल, यासाठी मेहनत घेतल्याने वर्षाला गडचिरोली जिल्ह्यातील (Bhandara) शेतकरी किशोर रामकृष्ण मेश्राम लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
२००८ मध्ये भंडारा जिल्ह्याच्या दवडीपार येथे केंद्रीय रेशीम बोर्डात प्रशिक्षण घेतले व २०१० पासून स्वतः रेशीम व्यवसायास (Sericulture Farming) सुरुवात केली; परंतु हीच शेती शासनाचा पुरस्कार मिळवून देईल, असे वाटले नव्हते. मागील वर्षी ४ लाख ९९ हजार रुपयांचे उत्पादन मिळाले. याच शेतीतून बोरीचक येथील रेशीम शेतकरी किशोर रामकृष्ण मेश्राम यांनी आपल्या आर्थिक सुबत्तेचे जाळे विणले.
गडचिरोली हा जंगलाचा जिल्हा आहे. येथे टसर रेशीम शेतीच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या वनस्पती आहेत. यापैकी येनाची झाडे भरपूर प्रमाणात आहेत. याच झाडांवर टसर रेशीम शेतीला वाव आहे. हीच संधी ओळखून आरमोरी तालुक्याच्या बोरीचक येथील अल्पभूधारक शेतकरी किशोर रामकृष्ण मेश्राम यांनी टसर रेशीम शेती कसण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात जंगलावर आधारित टसर रेशीम शेतीला वाव असल्याने त्यांनी याच शेतीतून अधिक उत्पादन कसे घेता येईल, यासाठी मेहनत घेतल्याने वर्षाला ते लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
स्वतः सुरू केली अंडीपुंजनिर्मिती रेशीम शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना शासन अंडीपुंजासाठी ७५ टक्के अनुदान देते. याचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी किशोर मेश्राम यांनी ढिवर समाज संस्थेच्या माध्यमातून अंडीपुंजनिर्मिती सुरू केली. ते अन्य शेतकऱ्यांना याचा पुरवठा करतात. जिल्हा रेशीम अधिकारी अजय वासनिक यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या या शेतीची दखल घेत रेशीम संचालनालय नागपूरने त्यांना २०२२-२३ चा रेशीम रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या आहेत प्रजाती सुकिदा प्रजातीच्या माध्यमातून २८ ते ३० दिवस, ४० ते ४५ दिवस व ५५ ते ६० दिवस असे वर्षातून तीन वेळा, तर धाबा प्रजातीच्या माध्यमातून २८ ते ३० दिवस, ४० ते ४५ दिवसांत असे दोन वेळा उत्पादन घेतले जाते. तर निसर्गावर आधारित टसर रेशीम शेती दोन प्रकारे केली जाते. यामध्ये ट्राय ओव्हरटाइम व बाय ओव्हरटाइम आदी प्रकाराचा समावेश आहे. पहिल्या प्रकारात तीन वेळा, तर दुसऱ्या प्रकारात दोन वेळा उत्पन्न घेता येते.