Join us

Success Story : एका एकरांत 30 किलो भुईमूग पेरला अन् 20 क्विंटलचे उत्पन्न घेतलं! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 4:45 PM

विशेष म्हणजे कापूस पिकासाठी अनुकूल असलेल्या जमिनीत भुईमूग शेती यशस्वी केली आहे. 

महाराष्ट्रातील शेतकरी सजग झाला असून शेतीत वेगवगेळे प्रयोग करण्याबरोबरच नवनवीन पिके हाताळणी केली जात आहे. यातून चांगलं उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांना यासाठी उद्युक्त केले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) एका शेतकऱ्याने एकरात ३० किलो भुईमूग पेरून तब्बल २० क्विंटल विक्रमी उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे कापूस पिकासाठी अनुकूल असलेल्या जमिनीत भुईमूग शेती (Groundnut Farming) यशस्वी केली आहे. 

पूर्व विदर्भ धान, कापूस, मिरची व सोयाबीन पिकासाठी (Soybean) प्रसिद्ध आहे. त्यात प्रामुख्याने धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा नादच खुळा. त्याने केवळ एक एकरात ३० किलो भुईमूग पेरून तब्बल २० क्विंटल विक्रमी उत्पन्न घेतले.  धान, कापसासाठी अनुकूल जमिनीत भुईमूग पिकाचे भरमसाठ उत्पन्न घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे व आपणही आता आपल्या शेतात, असे पीक घेऊ शकतो असा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. 

दरम्यान पारंपरिक पिकापेक्षा वेगळं पीक घेण्याचा ध्यास विसापुरातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत दिनकर पावडे यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी पारंपरिक पिकासोबत १ एकरात ३० किलो भुूमुग पेरणी करून तब्बल २० क्विंटल उत्पन्न मिळवले. सर्वप्रथम भुईमूग पिकासाठी त्यांनी शेतात रोटर मारून घेतले व पलटी देऊन शेत तयार केले. यानंतर त्यांनी त्या एक एकरमध्ये शेणखत टाकले. त्यानंतर वेस्टन भुईमूग वाणाची निवड केली आणि पूर्व मशागत केलेल्या शेतात ते पेरले व योग्य फवारणी आणि अंतर्मशागतीच्या जोरावर त्यांना पिकातून चांगले उत्पादन मिळवता आले.

शेतीत योग्य व्यवस्थापन 

कोणत्याही शेतीत योग्य व्यवस्थापन केल्यास शेती यशस्वी होत असते. आम्हीं या शेतात कापूस करत असतो. मात्र यंदा एका एकरात भुईमूंग करण्याचे ठरविले. त्यानुसार इतर शेतकऱ्यांशी चर्चा करून भुईमुंगाचं कुठले वाण चांगले राहिलं याबाबत विचारणा केली. त्यानुसार तीस किलो बियाणे घेऊन एका एकरात लागवड केली. साधी जमीन असल्याने लागवड चांगली झाली. शिवाय काढणीसाठी अडचण आली आहे. सिंचनाची सुविधा, योग्यवेळी फवारणी इत्यादी गोष्टी केल्याने यशस्वी रित्या उत्पादन घेता आले. - शशिकांत दिनकर पावडे, शेतकरी 

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रचंद्रपूरकापूस