- बाबुराव बोंडे
Success Story : कारले कडू असतात, पण औषधी युक्त असतात. त्यामुळे बाजारात कारल्याला मोठी मागणी असते. हे कडू कारले एका शेतकरी कुटुंबासाठी गोड ठरले आहेत. बाप- लेकाने कारल्याची शेती केली. या शेतीतून त्यांना लाखोंचा नफा झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वेजगाव येथील या बाप-लेकाचे नाव आहे बाबुराव आस्वले आणि दीपक आस्वले. अवघ्या दीड एकरात त्यांनी कारल्याची लागवड केली होती. शेती नफ्याची नाही, अशी अधूनमधून ओरड ऐकायला येते. काही शेतकऱ्यांनी मात्र शेतीत नवीन प्रयोग करून शेतीला फायदेशीर केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मागासलेला तालुका अशी ओळख असलेल्या गोंडपिपरीत एकही उद्योग नाही. केवळ शेती येथील मुख्य व्यवसाय. तालुक्याला वर्धा, वैनगंगा, अंधारी नद्यांनी वेढा दिला खरा; मात्र एकही मोठा सिंचन प्रकल्प येथे नाही. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील शेतीला बसत असतो. पिकली तर शेती नाहीतर माती अशी येथील अवस्था. या साऱ्या संकटावर मात करीत काही शेतकऱ्यांनी शेतीत उंच भरारी घेतली आहे. वेजगाव येथील शेतकरी पिता-पुत्राची चर्चा सध्या होते आहे.
बाबुराव आस्वले हे ६५ वर्षांचे. पण त्यांची शेतीची ओढ सुटलेली नाही. मोठा मुलगा दीपक यांच्या सोबतीने ते शेतात नवीन प्रयोग करीत असतात. दोन एकर जागेत ते मिरची, भाजीपाल्याचे पीक घेतात. यावर्षी त्यांनी दीड एकर जागेत कारले पिकाचे उत्पादन घेतले. गावातील परशुराम लेडांगे यांनी कारले पिकाचा प्रयोग केला होता. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. दीपक आस्वले यांनी मार्गदर्शन घेतले. आणि कारल्याची लागवड केली. कारले पिकासाठी ५० हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. पीक चांगले जमून आले. आतापर्यंत त्यांनी एक लाखाचे कारले चंद्रपूरचा बाजारात विकले आहेत. पुन्हा एक ते दीड लाखाचे उत्पादन होणार, अशी त्यांना आशा आहे.
इतर भाजीपाला पिकांचीही लागवड दीपक यांनी शेतात बोअरवेल खोदली आहे. यातून ते शेत पिकांना सिंचन करतात. टमाटर, ढेमसे, काकडी, मिरची आणि पालेभाज्यांचे ते लागवड करतात. शेतकामात त्यांना वडील, पत्नी, लहान भावाची मदत होत असते. कृषी क्षेत्रातील कुठलीही पदवी नसताना केवळ अनुभवाच्या जोरावर पिता, पुत्राने शेती फुलविली आहे. दिवसभर शेतात घाम गाळणाऱ्या आस्वले कुटुंबांनी शेतीतूनच आर्थिक प्रगती साधली.