Join us

कोण म्हणतं 'साठी बुद्धी नाठी'? दीड एकरात केळी, तीन एकरांत आमराई मोहरली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 10:44 AM

या यशकथेचा 'किमयागार कोणी एखादा उमदा तरुण नाही तर साठीपार केलेले एक 'ज्येष्ठ आहेत.

बालाजी आडसूळ

धाराशिव : हलकी, मुरबाड जमीन, जिथे काहीही पेरलं तरी उगवत होतं फक्त कुरुडू नावाचे तण, शिवारात 'नापीक' असा शिक्का असलेल्या या वावरास त्यांनी मोठ्या कष्टाने उपजाऊ बनवलं. आज तिथे दीड एकरावर केळी, तर तीन एकरांत केशर आमराई बहरली आहे. केळी सात-आठ, तर आंबा पाच-सहा लाखांचा होईल. या यशकथेचा 'किमयागार कोणी एखादा उमदा तरुण नाही तर साठीपार केलेले एक 'ज्येष्ठ आहेत.

प्रल्हाद रामभाऊ तोडकर (रा. हसेगाव के.) असे त्यांचे नाव, जिल्हा बँकेतून निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला काळ्या आईच्या सेवेत वाहून घेतलं. काहीही न पिकणाऱ्या शेताला हिरवाई आंदण देत एका मळ्यात रूपांतर केलं. जीवनप्रवासात 'आपण अन् आपलं काम भलं' या तत्त्वांचे आचरण त्यांनी केले. आजही त्यांनी दिनचर्या कष्टातच जाते. सोबतीला पत्नी मंदाकिनी यांची अविरत साथ असतेच. या सर्वाच्या बळावरच आज दीड एकरातील बहरलेली केळी सहा-सात लाखांचे निव्वळ, तर आंबा पाच-सहा लाखांचे उत्पन्न मिळवून देणार आहे.

तीन एकरांतील आमराई मोहरली..

तोडकर यांनी २००७ व २०२० मध्ये टप्प्याटप्याने प्रत्येकी दीडशे केशर आंबा रोपे तीस बाय तीस, पंधरा बाय पंधरा अशा मिश्र अंतरावर लावले. ते जोपासले. यानंतर मागच्या दोन वर्षात यातील रिकाम्या अंतरात परत दोन्हींच्या मोकळ्या जागेत तेवढीच रोपे लावली. आज ही आमराई मोहराने बहरली आहे. गतवर्षी चारेक लाख हाती आले, यंदा सात आठ टन माल निघून पाचेक लाख हाती येतील. यातील तीनेक टन माल स्वतः सिंगल काट्यावर विक्री तर बाकी माल व्यापाऱ्यांना दिला जातो. दोन बोअरवेल्स व एक विहिरीच्या जेमतेम पाण्याचा सुयोग्य वापर करत अविरत साथ देणारी पली मंदाकिनी यांच्या साथीनें हा मळा फुलवला आहे, असे पी. आर. तोडकर यांनी सांगितले.

कोण म्हणतं 'साठी बुद्धी नाठी' ?

'साठी बु‌द्धी नाठी अशी एक म्हण आहे. या वयात नाउमेदीची काठी हाती येते, असा एक कयास. मात्र, यास खोटं ठरवत पी. आर. तोडकर वयाच्या ६७ व्या वर्षी प्रयोगशील शेती करतात, हाती खोर पाटी घेत स्वतः कष्ट उपसतात. पहाटेच शेतात पोहचत वैरणकाडी, शेणपाणी, धाराधुरा काढतात. पिकलेला माल घेऊन बाजार गाठतात, तिथे सहचारिणी मंदाकिनी हाती वजनकाटा करत माल विक्री करतात. दिवसभर शेतात राबतात, सायंकाळी घराचा उंबरठा गाठत दिनश्चर्या सुखाची मानत निद्राधीन होतात. ही कथा, एखाद्या उमद्या तरुणासारखी तितकीच नाउमेद झालेल्या मनाची उमेद वाढवणारी अशीच.

दीड एकरातील केळी बहरली

प्रल्हाद उर्फ पी.आर. तोडकर यांनी मागच्या मे महिन्यात दीड एकरात नांगरट, मोगडणी अशी पूर्व मशागत करत सहा फूट अंतरावर बोध पाडले. पाच ट्रॅक्टर शेणखत टाकले, ठिबक अंथरले. छत्रपती संभाजीनगरातून प्रतिरोप १६ रुपयांप्राणे दोन हजार टिश्युकल्चर रोपे आणत पाच फूट अंतरावर लागवड केली. दीडेक महिन्यात गुडघाभर वाढ झाल्यावर भेसळ डोस दिला. पुढे ठिबक व रिंगण पट्धतीने खते मिळाल्याने जोमदार वाढ झाली. आज ४० ते ४५ किलो वजनाचे हजारेक खूट हाती लागलेत. त्यास २५ ते ३० रुपयांचा प्रतिकिलो दर मिळाल्यास दोन लाखांचा खर्च जाऊन सहा-सात लाखांचे निव्वळ उत्पन्न पदरी पडणार आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीउस्मानाबादशेतकरीकेळी