- गाेपाल लाजूरकर
गडचिराेली : पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून शेती नफ्याची कशी हाेईल, यादृष्टीने विचार करून प्रत्यक्ष त्याचा अवलंब केला. केवळ एकच पीक न घेता विविध प्रकारची पिके घेऊन आपली आर्थिक प्रगती केली. त्यांच्या प्रगतशील शेतीची (Farmer Success Story) दखल घेत यावर्षी राज्य शासनाच्या कृषी विभागाने त्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार’ प्रदान केला.
ही यशाेगाथा आहे, देसाईगंज शहराच्या तुकूम वाॅर्डातील श्रीराम गाेपाळराव अनमदवार यांची. त्यांची प्रयाेगशील शेती (Experimental farming) इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेतकरी श्रीराम अनमदवार यांची नैनपूर येथे १.७० हेक्टर शेती आहे. त्यांनी इयत्ता सातवीपर्यंतच शिक्षण घेतले. त्यानंतर ते शेती व्यवसायात रमले. आता त्यांच्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत. कुटुंबातील त्यांची मुले व इतर सदस्यसुद्धा शेती व्यवसाय करत आहेत. धान पिकाच्या (Paddy Farming) शेतीसह भाजीपाला लागवड, आंब्यासह अन्य झाडांची फळबाग शेती, पशुपालनातून दुग्ध व्यवसाय आदी व्यवसाय ते करत आहेत.
मागणीचा विचार करूनच भाजीपाला लागवड
बाजारात मागणी असलेल्या व पुरवठा कमी असलेल्या पिकांची निवड करून अनमदवार हे भाजीपाला पिकाची लागवड करतात. ठिबक सिंचन, प्लास्टिक मल्चिंगसह सुधारित पद्धतीचा अवलंब करतात. उत्पादित भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री स्टॉलच्या माध्यमातून देसाईगंजच्या बाजारपेठेत करतात. याशिवाय विविध अभ्यास दौरे, प्रशिक्षणे, कार्यशाळांमध्ये ते हिरीरीने सहभागी हाेतात.
श्री, पट्टा पद्धतीने धान लागवड
पट्टा व श्री पद्धतीने धान लागवड, युरिया ब्रिकेस्टचा वापर करताना कीड नियंत्रण करण्यासठी जैविक कामगंध, चिकट सापळे, ट्रायकोकार्डचा वापर, कापणीवर आलेले धान पीक अवकाळी पाऊस व तुडतुडा किडीपासून संरक्षित करण्यासाठी धान पिकाच्या जुड्या बांधून उत्तम व्यवस्थापन करतात.
पशुपालनासाठी मुक्त गाेठा; फवारणीसाठी जैविक औषधे
शेतकरी अनमदवार यांनी मुक्त गोठा बांधणी केली आहे. पशुधनाचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी जाळीचा वापर केलेला आहे. मूत्र साठवणुकीसाठी गोठ्यापासून सरळ टाकी बांधून त्यात संकलित केले जाते. पिकांवर कीड नियंत्रणासाठी फवारणीकरिता तयार केल्या जाणाऱ्या अर्कामध्ये त्याचा वापर केला जाताे. पिकांना विद्राव्य खते देतात. फळांचे किडींपासून नियंत्रण करण्यासाठी सापळे लावतात. फवारणीसाठी दशपर्णी अर्क, जैविक औषधींचा वापर करतात.
लागवडीसाठी सुधारित वाणांची निवड
अनमदवार हे आपल्या शेतात विविध प्रकारचा भाजीपाला पिकवतात. यामध्ये मिरची, वांगी, टोमॅटो, चवळी, कारले, कोबी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. भाजीपाला बियाण्यांचे सुधारित व उत्तम वाण निवडून ते लागवड करतात व त्यातून भरघाेस उत्पादन घेतात.
MPSC Success Story : अल्पभूधारक शेतकऱ्याची लेक झाली उपविभागीय कृषी अधिकारी, वाचा यशोगाथा