Join us

Success Story : माळरानावर डाळींबाची यशस्वी शेती, आठ एकरात 80 टन उत्पादन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 9:04 PM

Success Story : पाणी नसलेल्या माळरानावर ८ एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग (Dalimb Farming) फुलवून एक आदर्श निर्माण केला आहे.

Success Story : नाशिकच्या (Nashik) बागलाण तालुक्यातील विंचुरे येथील प्रकाश बाळू शिंदे यांनी खडतर, पाणी नसलेल्या माळरानावर वडिलोपार्जित १६ एकरापैकी ८ एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग (Dalimb Farming) फुलवून एक आदर्श निर्माण केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इनलाईन ठिबकचा वापर करत शेती यशस्वी केली आहे. जिद्द, चिकाटी व मेहनत केल्यास कोणतेही यश दूर नाही, असा विश्वास त्यांनी तरुण शेतकऱ्यांमध्ये जागविला आहे.  

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीचा मगदूर तसा एकदम हलका मुरबाडसदृश. शिंदे कुटुंबीयांनी डोंगराच्या पायथ्याशी असलेली उंच सखल मुरबाड जमीन मोठ्या कष्टाने समतल केली. तेथे जमिनीत पाणी नसल्यामुळे तेथे विहीर न करता ३ कि.मी. लांबून पीव्हीसी पाइपलाइनने तेथे पाणी आणले. त्यात ८ एकर क्षेत्रावर डाळिंब पिकाची लागवड केली. अवधी तीन पिके घेतल्यानंतर संपूर्ण बाग तेल्या रोगाला बळी पडली. सलग तीन वर्षे या पिकात तोटा आल्याने नाइलाजाने बाग काढून टाकली. परंतु, पुन्हा कर्जरूपाने व कांदा, भाजीपालासारख्या पिकातून मिळालेल्या उत्पन्नातून त्याच जमिनीत द्राक्षबाग फुलवली. 

डाळिंबाप्रमाणेच सुरुवातीला दोन- तीन पिके काढल्यानंतर सलग तीन ते चार वर्ष तयार झालेले द्राक्ष पीक (Grape Farming) अतिपावसामुळे बाजारात गेलेच नाही. प्रकाश शिंदे व त्यांचे वडील बाळू शिंदे यांनी कुटुंबातील इतर सदस्यांच्या साथीने पुन्हा त्या शेतीत डाळिंब लावायचा धाडसी निर्णय घेतला. मागील सहा-सात वर्षे कसमादे पट्टयातील डाळिंबबागा तेल्या, प्लेग, खोडकिड, सूत्र कृमी व फळमाशी इत्यादी अनेक प्रकारच्या रोगांमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे धोक्यात आलेल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचा केलेला खर्चही निघत नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे कुटुंबीयांनी या बरड जमिनीत पुन्हा ८ एकरवर डाळिंब लागवड करण्याचा निर्णय घेतला.

आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर... शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा केला, कमी पाणी देणारी इनलाइन ठिबक संचाचा वापर केला. द्राक्ष शेतीच्याच जागेवर डाळिंब लागवड केल्याने दाक्षबागेच्या तार व अँगल या स्ट्रक्चरचा वापर डाळिंबाच्या फांद्या बांधणीसाठी केला. १०० ग्रॅमचे फळ तयार झाल्यावर बागेवर नेटलॉन आच्छादन केले. खत व औषध फवारणीचे कार्यक्षम व्यवस्थापन करून उत्कृष्टरीत्या निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले. अवघे २४ महिन्यांच्या झाडावर एकरी दहा टन याप्रमाणे आठ एकरात ८० टनाचे उत्पादन त्यांना मिळाले.

टॅग्स :डाळिंबशेती क्षेत्रकृषी योजनाशेतीनाशिक