सुनील चेके पाटील
बुलढाणा : बेभरवशाचा मान्सून आणि हवामानातील अस्थिरतेमुळे पारंपरिक शेतीचे गणित दरवर्षी बिघडत चालले आहे. यामुळे नापिकीचे संकट ओढवून शेतक-याचे अर्थचक्र कोलमडत आहे. परिणामी, अनेक शेतकरी नैराश्येने ग्रासले आहेत. मात्र, संकटापुढे गुडघे न टेकता धैर्याने आणि मेहनतीच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्यातील वरखेड येथील अल्पभूधारक शेतकरी भारत जगदेव कणखर यांनी मिरची आणि टोमॅटो बिजोत्पादनातून अवध्या तीन महिन्यांत लाखोंचे उत्पन्न काढून अन्य शेतक-यांसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.
राज्यातील तरुणांची संख्या शेतीत वाढू लागली. अनेकजण पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेतीचा प्रयोग करत आहेत. तर काहीजण नोकरी सोडून फुल टाइम शेतीला देऊ लागले आहेत. त्यामुळे अनेकांना याचा फायदा देखील असल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील कणखर यांनी कमी शेती असताना शेतीत नंदनवन फुलविले आहे. त्यांच्याकडे 1 हेक्टर 40 आर. शेतजमीन आहे. पदवीधर असूनही कणखर यांना नोकरीने मात्र सतत हुलकावणी दिली. स्वतः सह कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असून, थोडयोडक्या शेतीवर कसे भागणार, या चिंतेने त्यांना ग्रासले होते.
मात्र, नियतीपुढे हार न मानता परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी शेतीच्या व्यवसायातच प्रगती साधण्याचा पक्का निर्धार केला, निव्वळ पारंपरिक पिके घेऊन भागणार नाही वातावरणाची साथ न मिळाल्यास, शेतमालाला बाजारात योग्य दर न मिळाल्यास करणार काय, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता, त्यामुळे या भानगडीत न पडता त्यांनी सक्षम पर्याय म्हणून बिजोत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले. त्यानुसार, गेल्या 10 वर्षापासून काही कंपन्यांशी बेट करार करून शेडनेटमध्ये मिरची, वांगी आणि टोमॅटोचे बिजोत्पादन ते घेत आहेत.
प्रत्येकी 10 गुंठ्यात मिरची, टोमॅटोचे बीजोत्पादन
शेतकरी भारत कणखर यांनी 10 गुंठ्यात मिरची बिजोत्पादन केले. त्यातून त्यांना 50 किलो बियाण्याचे उत्पादन झाले. 8 हजार 500 रुपये प्रतिकिलोप्रमाणे 4 लाख 25 हजारांच उत्पन्न त्यांना या माध्यमातून मिळाले लागवड खर्च वजा करता अवघ्या तीन महिन्यात 3 लाख 75 हजारांचा निव्वळ नफा मिळाल्याचे त्यांनी सागितले. यासह 10 गुंठ्यात केलेल्य टोमॅटो बिजोत्पादनातून 22 किलो बियाणे हाती आले. त्यास 12 हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे 4 महिन्यात खर्च वगळता निव्वळ नफा २ लाख 24 हजार रुपये झाल्याची माहिती त्यांनी दिली. पारंपारिक पिकांना त्यांनी फाटा दिला.