Join us

Success Story : मेहनत रंग लायी! काश्मीरचे सफरचंद जळगावात पिकवलं, रावेरच्या शेतकऱ्याचा प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 12:23 PM

हॉट सिटी अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्याने सफरचंदाची बाग फुलवली आहे.

सफरचंद म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येतं ते काश्मीर पण हेच सफरचंद 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या प्रदेशात पिकू शकतं, तसं कोणी तुम्हाला सांगितलं तर शक्यच नाही, असं तुम्ही म्हणाल, पण हॉट सिटी अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात एका शेतकऱ्याने सफरचंदाची बाग फुलवली आहे. या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत सफरचंद पिकाची शेती यशस्वी केली आहे. 

उज्वल पाटील या शेतकऱ्याने आपल्या तरुण मुलांच्या मदतीने ही सफरचंदाची बाग फुलवली आहे. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचुर गावचे रहिवासी आहेत. शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करायचा या उद्देशाने त्यांनी पाऊल टाकलं आणि त्यांना यश दिसू लागलं आहे. तसं पाहिलं तर केळी पिकवणारा जिल्हा ही जळगाव जिल्ह्याची खरी ओळख पण उज्वल पाटील यांनी ही ओळख बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला आहे. नैसर्गिक संकट, कवडीमोल मिळणारा भाव यासारख्या कारणांमुळे केळी परवडत नाही. त्यावर पर्याय म्हणून त्यांनी सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांनी बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलांची मदत घेत मेहनतीच्या बळावर आज त्यांनी सुंदर अशी बाग फुकवली आहे.

रावेर तालुक्यातील कोचूर परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होते; परंतु पारंपरिक केळी पिकाला पर्याय म्हणून येथील प्रगतिशील शेतकरी उज्ज्वल पाटील व त्यांचा मुलगा पीयूष उज्ज्वल पाटील व प्रणव संदीप पाटील यांनी सफरचंदाची लागवड केली आहे. केळी या भागातील मुख्य पीक आहे; मात्र काही दिवसांपासून कधी अस्मानी संकट, तर कधी केळीला खर्च मोठ्या प्रमाणात आहे. केळीला भावच नाही. केळी पिकाला लागणारा समाधानकारक असा भाव मिळत नसल्याने या शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग म्हणून हिमाचल प्रदेशातून सफरचंद पिकाची रोपे आणून लागवड केली.

हिमाचल प्रदेशातून रोपांची खरेदी 

दरम्यान या कुटुंबाने हिमाचल प्रदेशातील हरिमन शर्मा यांच्याशी संपर्क साधत तेथील त्यांच्या नर्सरीला भेट दिली. शर्मा यांच्याकडून सफरचंदाची शेतीचे आर्थिक गणित लक्षात घेऊन त्यांच्याकडून सफरचंदाची ‘एचआर - ९९’ या जातीची ३६५ रोपे खरेदी केली. त्यानंतर पाटील कुटुंबाने पाऊण एकर क्षेत्रात सफरचंदाची डिसेंबर २०२२ लागवड केली. सध्या या झाडांचे वय हे १६ ते १७ महिने इतके असून पहिल्या वर्षीच या झाडांना मोठ्या प्रमाणात फुलेही आली आहेत. तसेच , झाडं देखील सात ते आठ फुटांपर्यंत वाढली आहेत. शिवाय लागवड केलेल्या झाडांपासूनची पहिली काढणी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाटील कुटुंबाने केली. 

आंतरपिकांचा समावेश 

दरम्यान पाटील कुटुंब देखील यापूर्वी केळीचे उत्पादन घेत होते. मात्र सफरचंदाच्या शेतीला सुरवात केल्यानंतर या शेतीत आंतरपिके देखील घेण्यात आली आहेत. यात जैन इरिगेशनच्या पांढऱ्या कांद्याची यशस्वी लागवड केली होती आणि त्यानंतर आता पेरूचीही लागवड केली आहे. या पेरूच्या लहान लहान झाडांनाही पहिल्याच वर्षी फळे आली आहेत. शिवाय जळगाव जिल्हा म्हंटला की मोठ्या प्रमाणात तापमान असते; परंतु तापमानात देखील सफरचंदाची बाग फुलून दाखवली.

टॅग्स :शेतीजळगावफळेशेतकरीशेती क्षेत्र