अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील टाकळी येथील शेतकऱ्याने लोहयुक्त काळा गहू पिकवला असून, तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. प्रसन्ना धोंगडे या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे पाच किलो बियाणे वापरून दोन गुंठ्यांत पंचेचाळीस किलो उत्पन्न घेतले आहे. आता या पंचेचाळीस किलोच्या बियाण्यातून पोत्याने उत्पन्न घेण्याचा त्याचा मानस आहे. माहितीच्या महाजालाचा योग्य उपयोग करून काळ्या गव्हाच्या पिकाची माहिती मिळत आपल्या बरड शेतीत त्यांना काळा गहू पिकाचा प्रयोग यशस्वी केला.
अकोलेतील शेतकरी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. पारंपरिक पिकांना बगल देत पीक पद्धतीत बदल करीत असतात. यापूर्वी जांभळ्या निळ्या भात-तांदूळ पिकाचा प्रयोग प्रवरा काठावरील मेहेंदुरी तसेच आदिवासी भागातील शिरपुंजे परिसरातील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला. असाच एक प्रयोग तालुक्यातील प्रवरा काठावरील टाकळी येथील शेतकरी धोंगडे यांनी काळ्या गव्हाचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या आई वडिलांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होत असल्याने त्यांनी काळा गहू या आजारासाठी गुणकारी असल्याचे वाचले. मग इंटरनेटवर पीक उत्पादनाची माहिती मिळवली. शेतात
काळ्या गव्हाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. काळा गव्हाचे बियाणे कोठे मिळते याचा शोध घेतला. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे राहत असलेल्या आपल्या मित्रामार्फत पंजाबमधून ५ किलो काळ्या गव्हाचे बियाणे ५५० रुपयांना खरेदी केले होते. त्यांनी आपल्या शेतात दोन गुंठ्यांत गव्हाची लागवड केली. त्यामध्ये ४५ किलो उत्पादन मिळाले. सध्या काळ्या गव्हाला किलोला ७० रुपये भाव मिळतो.
काळ्या गव्हामध्ये सामान्य गव्हापेक्षा ६० टक्के जास्त लोह असते. गव्हाचा काळा रंग त्यामध्ये असलेल्या अँथोसायनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे होतो. या जातीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याची चव सर्वसामान्य गव्हासारखीच असते. काळ्या गव्हाची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक
एका किलो काळ्या गव्हाची किंमत ७० रुपये आहे, जी सामान्य गव्हाच्या तुलनेत तीनपट अधिक आहे. तथापि, काळ्या गव्हाचे पौष्टिक फायदे लक्षात घेता ते अजूनही कमी किमतीत उपलब्ध आहे आणि भविष्यात ते अधिक महाग मिळण्याची शक्यता आहे. काळ्या गव्हाचे पीठ बाजारात १३० रुपयांना मिळते. काळा गहू ही कृषी क्षेत्रात नवी क्रांती ठरू शकते. याचे असंख्य पौष्टिक फायदे आहेत आणि ते सामान्य गव्हासारखे पीक घेतले जाऊ शकतात. शेतकऱ्यांनी या पिकाचे प्रयोग करून वैयक्तिक पातळीवर बियाणे मागवावे. सामान्य गव्हाच्या तुलनेत काळ्या गव्हाला पेरणीसाठी कमी जागा लागते. योग्य मार्केटिंग आणि जागरुकतेमुळे काळा गहू शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक ठरू शकते.
काळ्या गव्हाचे पौष्टिक फायदे
काळ्या गव्हामध्ये प्रथिनांचे प्रमाण, आहारातील फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, फ्लेव्होनॉइड आणि फिनोलिक सामग्री अँटिऑक्सिडंट क्रिया पारंपरिक पिवळ्या गव्हापेक्षा जास्त असते. संशोधन असे सूचित करते की काळा गहू हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, जळजळ, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणापासून संरक्षण करतो. काळ्या गव्हातील फायबर घटक कर्करोग, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. अॅथोसायनिन आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. काळ्या गव्हात अँथोसायनिन असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ब्लूबेरी आणि जांभूळ या फळांमध्ये अँथोसायनिनचे प्रमाणही जास्त असते. परंतु ही फळे वर्षभर उपलब्ध नसल्यामुळे काळा गहू आपल्या दैनंदिन आहारात या पोषक तत्त्वांचा सहज स्रोत प्रदान करतो.
काळ्या गव्हाची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते. त्यामुळे गुगलवर काळ्या गव्हाची माहिती मिळवली. यासाठी पंजाबमधून पाच किलो बियाणे मिळवून दोन गुंठे लागवड केली. या बियाणातून जवळपास ४५ किलो उत्पादन मिळाले. या उत्पन्नातून १० किलो गहू घरी खाण्यासाठी ठेवणार असून, बाकी गहू बियाणे म्हणून वापरून शेतीमधून अधिक उत्पन्न घेणार आहे.
- प्रसन्ना धोंगडे, शेतकरी