- मोहन सारस्वत
जळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाची कास व त्याला जिद्दीची जोड देत कलिंगड व पपईच्या (Papaya) पिकातून गोरनाळे (ता. जामनेर) येथील युवा शेतकरी मोहन सीताराम वाघ यांनी समृद्ध शेतीची संकल्पना पूर्ण केली आहे. याबरोबरच त्यांनी मत्स्यशेतीचा (Fish Farming) यशस्वी प्रयोग करून स्वयंरोजगाराचा नवा आदर्श शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे.
आज अनेक युवा शेतकरी शेतीचं अद्ययावत शिक्षण घेऊन शेतीत पाउल टाकत आहेत. अनेक वेगवगेळे प्रयोग या युवा शेतकऱ्यांकडून केले जात आहेत. म्हणजेच शिक्षणाच्या जोरावर आधुनिक शेतीला नवा आयाम देण्याचे काम ही युवावा शेतकरी पिढी करत आहेत. असाच काहीसा वेगळा प्रयोग वाघ यांनी केला आहे. सुरवातीलाच फळ शेतीच्या (Fruit Farming) माध्यमातून शेती क्षेत्रात पाऊल टाकले. यात कलिंगडाबरोबरच पपईची उत्तम शेती करण्यात त्यांना यश आले. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी मत्स्यशेतीचा प्रयोगही यशस्वीतेकडे वाटचाल करत आहे.
वाघ हे बी. एस्सी. कृषी शाखेचे पदवीधर आहे. त्यांच्याकडे स्वतःची २५ एकर जमीन आहे. त्यांनी अडीच एकरात ८ बाय ६ अंतराने २ हजार सेंद्रिय पपईची फळबाग केली होती. दहा महिन्यांत या फळबागेवर त्यांनी सहा लाखांचे उत्पन्न मिळविले. लागवडीचा खर्च १ लाख होऊनही त्यांना सुमारे ५ लाखाचा निव्वळ नफा मिळाला. पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता त्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून पाणी दिले. पपईच्या झाडाला लागलेल्या एका फळाचे वजन ३ ते ४ किलो इतके भरले. त्यांनी लागवड केलेल्या पपईला मुंबईतूनही मागणी होऊ लागली.
विकेल ते पिकेल संकल्पना राबवली!
वाघ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी 'विकेल ते पिकेल' अंतर्गत कलिंगडचे एकरी ३० ते ३५ टन असे विक्रमी उत्पादन घेतले. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचा गौरव केला आहे. यावर्षी त्यांनी केळी, पेरू, मका, मिरची, वांगी, कपाशी, मका, लिंबू, तूर व बोर लागवड केली आहे. वाघ यांनी कृषी विभागात २ वर्षे शेती शाळा प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. कृषी विभागाकडून त्यांना युवा शेतकरी पुरस्कार मिळाला आहे.