जळगाव : जळगाव जिल्ह्यात केळीची शेती (Jalgaon Banana) प्रसिद्ध आहे. याचबरोबर इतरही पिके घेतली जातात. शिवाय अनेक शेतकरी केळीसोबत नवे प्रयोग करण्यावर भर देत आहेत. याच अनुषंगाने भडगाव तालुक्यातील आमडदे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी फळपीक आणि आंतर पिकांच्या (Intercropping Farming) माध्यमातून ६० गुंठे शेतातून लाखाचे उत्पन्न मिळविले आहे.
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक मोतीलाल पाटील यांचे आमडदे शिवारात ६० गुंठे क्षेत्र आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सेंद्रिय शेतीकडे (Organic Farming) आपला कल वळविला. कृषी खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रासायनिक खतांचा वापर न करता आधुनिक शेती करण्याचे ठरविले. ६० गुंठे क्षेत्रात अगोदर ठिबक सिंचन केले.
त्यानंतर त्यात आंबे (२७० रोपे), नारळ (२५० रोपे), शेवगा (१५० रोपे) तसेच आंतरपीक म्हणून पपई, तूर, कांदा, लसूण, पालेभाज्या लागवड केली. कृषी विभागातील अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने दोन आंब्याच्या झाडांमध्ये २५० टीडी नारळ वाणाची लागवड केली. आंबे व नारळामध्ये आठ बाय दोन अंतरावर तुरीची लागवड केली.
बांधावर लावला शेवगा, पपईतूनही मिळवले उत्पन्न
दोन झाडांच्या ओळीमध्ये ६०० आईस बेरी या पपई वाणाची लागवड केली. त्याचबरोबर साठ गुंठे क्षेत्रावरील बांधावर दीडशे शेवगा झाडांची लागवड केली. त्याचबरोबर भाजीपाल्याची लागवडदेखील त्यांनी केली. त्यामध्ये कांदा, लसूण, मेथी, पोकळा, कारले, गिलके, दोडके, भेंडी, पालक, कोथिंबीर, आदी पालेभाज्यांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करीत लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा या संकल्पनेला प्रतिसाद मिळत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी गावातील व परिसरातील नागरिक प्रत्यक्ष शेतात येऊन मार्गदर्शन घेत आहेत.
शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र यावर उपाययोजना करत नवनवे प्रयोग शेतीत करणे अपेक्षित आहे. एकीकडे रासायनिक खतांचा भडीमार यामुळे जमीन चालली आहे, उत्पादन घटत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. तसेच शेतीसोबतच इतर कमी कालावधीच्या परंतु चांगले उत्पादन देणाऱ्या शेती व्यवसायाकडे वळले पाहिजे. यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतीला नवा आयाम देणे आवश्यक आहे.
- अशोक पाटील, शेतकरी.