जळगाव : मशरूमचे उत्पादन साधारणतः प्रदेशातच घेतले जाते. मात्र अलीकडच्या महाराष्ट्रातील अनेक भागात मशरूम शेती मूळ धरू लागली आहे. त्यातच अनेक नवतरुण देखील मशरूम शेतीकडे वळू लागले आहेत. नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा असलेल्या शिरपूर तालुक्यातील सटीपाणी येथील डॉ. रवींद्र पावरा या अल्पभूधारक शेतकऱ्याने सातपुड्याच्या दुर्गम भागात मशरूम घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
डॉ. रवींद्र पावरा यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले असून तोरणमाळ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. रवींद्र पावरा यांच्या घरी वडिलांची अल्पभूधारक कोरडवाहू जमीन आहे. पारंपरिक पिकांच्या माध्यमातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कुटुंब हतबल झाले होते. अशातस धडगावला मशरुम व्यवसाय प्रशिक्षणाला उपस्थित राहिल्याने त्यांनाही मशरूमबाबत कुतूहल वाटले. आपल्या परिसरातदेखील याचा प्रयोग करण्याचे त्यांनी निश्चित केले. राजेंद्र वसावे व लीला वसावे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी दुष्काळी पट्टयात मशरूमचा यशस्वी प्रयोग करत आर्थिक प्रगती साधली.
कमी खर्चात मशरूम शेडची निर्मिती
वडिलांच्या गावात असणाऱ्या शेतीत कायम पारंपरिक पीक घेऊन वर्षाकाठी हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळं शेतीत नवीन काही तरी करायचे डॉ. पावरा यांनी ठरवले. मशरूम पिकाबाबत प्रशिक्षण घेऊन आपल्या राहत्या घरातील एका कोपऱ्यातच त्यांनी त्यासाठी शेड उभारले. त्याला आतून आणि बाहेरून ग्रीन मॅट लावली. शिवाय आतून बारदानाचे अच्छादनही दिले. बांबूंचे टेबल तयार केले.
दीड महिन्यात निव्वळ नफा
मशरूम हे 45 दिवसांचे पीक आहे. या कालावधीमध्ये तीन वेळा याची काढणी करता येते. ज्यात पहिल्यांदा 25 व्या दिवशी त्यानंतर 35 व्या आणि शेवटची काढणी ही 45 व्या दिवशी घेतली जाते. मशरुमला 300 रुपये प्रतिकिलो दर मिळतो. सगळा खर्च जाऊन डॉ. पावरा यांना दीड महिन्यात जवळपास 25 ते 30 हजारांचा लाभ झाला आहे. मशरूम उत्पादक डॉ. रवींद्र पावरा म्हणाले की, पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून नावीन्यपूर्ण मशरुमचे उत्पादन घेतले आहे. हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी निश्चित आशादायी आहे.
मशरूमचे उत्पादन कसे होते?
गव्हाचा किंवा सोयाबीनचा भुसा घेऊन ते पाण्यात मिसळून त्यांचे निर्जतुकीकरण केले जाते. भिजलेला भुसा बाहेर काढून मोकळा करायचा. त्यात 60 टक्के आर्दता झाल्यास त्या भुशामध्ये मशरूम बीज टाकून पॉलिथिनमध्ये भरून घ्यायचे. त्यानंतर ते बेड एका हवाबंद रुममध्ये ठेवायचे. ज्या खोलीचे तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 60 ते 70 टक्के असावी. 125 दिवसानंतर त्यावर मशरूम यायला सुरुवात होते.