Join us

Red Water Apple Farming : पाणी सफरचंद ऐकलंय का? धुळ्याच्या शेतकऱ्याचा रेड वॉटर अँपलचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 3:49 PM

Red Water Apple Farming : लागवडीनंतर ११ ते १३ महिन्यांनी रेड वॉटर सफरचंदाच्या (Apple Farming) झाडाला फळधारणा झाली आहे.

- लक्ष्मण गोपाळधुळे : आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातील थंड वातावरणात येणारी लालचुटुक रेड वॉटर सफरचंद (पाणी सफरचंद) (Red Water Apple) ४५ अंश तापमानाचा पारा असलेल्या रणरणत्या उन्हात कशी येतील, असा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होईल. मात्र, शेतीत धाडसाने वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शिरपूर (Shirpur) तालुक्यातील उमर्दा येथील प्रयोगशील शेतकरी जयवंत पाडवी यांनी रेड वाटर सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. शेतकऱ्याच्या कुतूहलातून ही किमया साधली आहे. त्यांनी लावलेली सफरचंदाची (Apple Farming) बाग सध्या बहरात आली आहे. 

परदेशातील स्ट्रॉबेरी (Strawberry) महाबळेश्वरला येते, मग आपल्या शेतात का येणार नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, दुष्काळी तालुक्यातील उपक्रमशील शेतकऱ्यांनी पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना विविध फळबागा घेतल्या. उमर्दा येथील प्रयोगशील शेतकरी जयवंत पाडवी यापैकीच एक प्रयोगशील शेतकरी. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या फळबागांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवले आहे. मात्र, रेड वॉटर सफरचंद लागवडीचा प्रयोग आपल्या भागात करायचा, असा चंगच पाडवी यांनी बांधला. त्यासाठी त्यांनी गुगल, युट्यूबवर बराच काळ रेड वॉटर सफरचंदाच्या (पाणी सफरचंद) शेतीचा अभ्यास केला. 

तर रेड वॉटर सफरचंदाची लागवड डिसेंबर महिन्यात करावी, असा त्यांना हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी सल्ला दिला. गेल्यावर्षी ग्रामीण भागात आंध्र प्रदेशातील विक्रेते फळझाडे व फुलझाडे विक्रीसाठी आले असता पाडवी यांनी त्यांना रेड वॉटर सफरचंदाबाबत सांगितले. त्यानुसार तेथील विक्रेत्यांशी संपर्क करून त्यांनी तेथील रोपवाटिकेतून रेड वॉटर सफरचंदाची रोपे उपलब्ध करून दिली. आपल्या परिसरात ही फळे येत नाहीत, असे बऱ्याच स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले. पण त्यांनी सर्वांनी दिलेला सल्ला बाजूला ठेवत मोठ्या धाडसाने ऐन उन्हाळ्यात रोपांची लागवड केली. युट्यूब, शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून झाडांची चांगली निगाही राखली. 

एका झाडापासून आठ ते दहा किलो किलो सफरचंद

दरम्यान लागवडीनंतर ११ ते १३ महिन्यांनी रेड वॉटर सफरचंदाच्या झाडाला फळधारणा झाली आहे. सातपुड्यातील डोंगरात उमर्दा येथे सध्या लालचुटुक रेड वॉटर सफरचंद फुलली आहेत. सुमारे १००- ग्रॅम वजनाची सफरचंदे झाडांना लागली आहेत. फळांची गोडी देखील चांगली आहे. यंदा एका झाडापासून अंदाजे आठ ते दहा किलो किलो सफरचंद मिळाली. तसेच पाडवी यांनी अर्धा एकर क्षेत्रात फणसाची झाडे लावली आहेत. पाडवी यांनी पारंपरिक शेती न करता यापूर्वीही वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यांनी शेती विषयक अनेक प्रयोग केले. त्यामधील काही यशस्वी झाले, तर काहीत नुकसानही सोसावे लागले आहे. हे रेड वॉटर सफरचंद बाजारात उपलब्ध झाल्यानंतर लाखोंचा नफा होणार असल्याचे ते म्हणाले. 

उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. आपल्याकडे पोषक वातावरण नसल्याने सफरचंदाची लागवड केली जात नाही. मात्र, शेतीत सफरचंद लागवडीचा प्रयोग करायचाच, अशी खूणगाठ बांधून लागवड केली. ती यशस्वीही ठरली. त्यामुळे दुष्काळी भागातही सफरचंद येतात, हे सिद्ध झाले.- जयवंत पाडवी, प्रयोगशील शेतकरी, उमर्दा,

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रजळगावधुळेशेतकरी