अझहर शेख
नाशिक : घरात आठराविश्व दारिद्र्य... तीव्र दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील दहिवंडी हे लहानसे गाव... हंगामात ऊसतोड करायची अन् नंतर हाताला मिळेल ते रोजंदारी कामे करत आई-वडिलांनी कष्ट उपसून चार मुलांना वाढविले. पोलिस शिपाई म्हणून सेवेत आलेला ओम भागवत आघाव उपनिरीक्षक झाला अन् त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न गोदाकाठी सत्यात उतरले. मात्र, ज्यांनी या स्वप्नपूर्तीसाठी घाम गाळला तेच हे आनंदाचे क्षण बघण्यासाठी नसल्याने आपल्या वडिलांच्या आठवणीने कासावीस झाला अन् आईजवळ येताच ओम तिच्या गळ्यात पडून अकादमीच्या मैदानावर ढसाढसा रडला.
मराठवाड्यातील बीड हा राज्यातील दुष्काळी जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो. यामुळे या जिल्हावासीयांच्या नशिबी संघर्षाची कहाणी आहेच. असाच संघर्ष आघाव कुटुंबाच्याही नशिबी आला. चार मुलांची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे ओमचे आई-वडील राबराब राबले. कडाक्याच्या थंडीत स्थलांतर करत बागायतदार जिल्ह्यांत ऊसतोडीच्या कामाला जाऊन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. ओम दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला पुढचे शिक्षण द्यायचे म्हणून वडील दिवंगत भागवत आघाव यांनी पत्नीला घेऊन थेट गुजरात गाठले. तेथे कारखान्यावर रोजंदारीने काम करून दोन पैसे जास्त पदरात पडतील, या आशेने कष्ट उपसले. ओम हे सर्व त्याच्या डोळ्यांनी बघत होता. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. बारावी उत्तीर्ण केली अन् पोलिस भरतीची जाहिरात वाचण्यात आली. त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अर्ज भरला अन् शिपाई म्हणून नोकरीही मिळाली.
आनंद अन् दु:ख सोबतच आले वाट्याला...
अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यांत होते. मात्र, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती साथ देणारी नसल्याने शिपाई म्हणून करिअरला सुरुवात केली. 2016 साली ओम पोलिस दलात भरती झाला. पोलिस झाल्याचा आनंदात कुटुंबीय असताना नियतीला हे मान्य नव्हते. त्याचवर्षी वडिलांचे आकस्मिक निधन झाले अन् ओमसह संपूर्ण कुटुंबावर आभाळ फाटले. या आघाताने तोदेखील खचला. मात्र, पुन्हा जिद्दीने पेटून उठला अन् संघर्षावर विजय मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
वडिलांची उणीव जाणवते...
पोलिस उपनिरीक्षक ओम आघाव म्हणाले की, आई-वडिलांच्या कष्टाला मोल नाही. त्यांच्यामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो. या आनंदाच्या क्षणी वडिलांची उणीव प्रकर्षाने जाणवते. यामुळे आईला बघून गहिवरून आले. उपनिरीक्षक म्हणून आता सेवा बजावताना गोरगरीब जनतेला न्याय देणे व त्यांच्या संरक्षणासाठी जीवाचे रान करणे. आपल्या आई-वडिलांसह महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उंचवायचे, हेच ध्येय मनाशी आहे.