- युवराज गोमासे
भंडारा : शहरालगतच्या खाेकरला येथील प्रगतिशील शेतकरी सुरेंद्र मदनकर यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत तोट्याची शेती कशी फायद्यात येते हे स्वकष्टातून दाखवून दिले आहे. यंदाच्या खरिपात त्यांनी दीड एकरातील आंबा व चिकूच्या बागेत (Mango farm) ड्रीप व मल्चिंगवर (Drip And Mulching) मायक्रोन्यूट्रीयनचा वापर करून तुरीचे आंतरपीक घेतले. सध्या दहा फुट उंचीचे तुरीचे पीक (Tur Farming) फुलोऱ्यासह शेंगांनी लदबदले आहेत.
शासकीय नोकरी करताना वेळ मिळत नसल्याची ओरड अनेकांची असते. परंतु, भंडारा शहरातील (Bhandara) राज्य शिक्षण विभागातील लेखा परीक्षण पथकात लेखा अधिकारी म्हणून कार्यरत खोकरला येथील सुरेंद्र मदनकर यांनी ही बाबच खोडून काढली आहे. ते घर, नोकरी सांभाळत मजुरांच्या माध्यमातून तीन एकरात सर्वोत्कृष्ट शेती कसत आहेत. गतवर्षी त्यांनी टरबूज, काकडी, चवळीची बाग फुलविली होती.
असं केलं नियोजन
यावर्षी दीड एकरातील आंबा व चिकूच्या बागेत हायब्रीड व पारंपरिक तुरीची (Tur Sowing) लागवड केली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी केल्यानंतर रोटावेटरने माती बारीक करीत बेड तयार केले. ड्रीप व मल्चिंगवर फळझाडांमध्ये सात फुटाचे अंतर राखत हायब्रीड तुरीच्या दोन सरी लावल्या. बुरशी व मर रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी ट्रायकोडर्मा व सुडोमोनोफास तसेच जैविक बुरशीनाशकाची ड्रीपधून ड्रिकिंग केली. जैविक खत, पाणी व कीटकनाशकांचे योग्य नियोजन करीत काळी माती अन्नदाती असल्याचे दाखवून दिले.
बॉक्स
दोन महिन्यात दोनदा केली शेंडे कापणी
तुरीचे पीक एक महिन्याचे, त्यानंतर दोन महिन्याचे असताना दुसऱ्यांदा शेंडे कापणी केली. त्यामुळे झाडांना अधिक प्रमाणात फुटवे आले. १५-१५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक, बुरशीनाशक व अळीनाशकाची फवारणी केली. पीक फुलोऱ्यावर असताना संजीवकांची फवारणी केल्याने फुल गळती थांबली.
तुरींना बांबू काठ्यांचा आधार
फुलोरा व शेंगांच्या भाराने तुरीचे झाड लदबदलेले आहेत. दहा फुट उंच झाडाच्या फांद्या नुकसानग्रस्त होऊ नये तसेच तुरीमुळे फळझाडांचे नुकसान होऊ नये, यासाठी सुरेंद्र मदनकर यांनी बांबूच्या सलग काठ्यांचा आधार दिला आहे.
बॉक्स
२० क्विंटल तुरीचे उत्पादनाचा अंदाज
तुरीचे पीक सध्या चांगलेच बहरले आहे. कीड व रोग नियंत्रणासाठी तसेच ढगाळ वातावरणामुळे होणारी फुलगळती थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली जात आहे. परिणामी, दीड एकरात २० क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.
Crop Cultivation : 'टोकण अन् ठिबक' वर झाली तूर यशस्वी ; एकेका झाडाला लगडल्या आठशे ते हजारावर शेंगा