जळगाव : सध्या केळीला शेतकऱ्यांना अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. मात्र यावरच जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील गडे दाम्पत्याने केळीवर प्रक्रिया करत केळीच्या पिठापासून गुलाबजामून बनविण्याचा अनोखा प्रयोग प्रत्यक्षात उतरविला आहे. विशेष म्हणजे याच दाम्पत्याच्या केळीच्या बिस्किटाला यापूर्वी पेटंट देखील मिळाले आहे.
कुसुम आणि अशोक प्रभाकर गडे या दाम्पत्याच्या यशाचा हा घड. ते मूळचे यावलचे. तापीकाठच्या केळी उत्पादकांच्या प्रत्येक वेदनांना आहेतच ते ओळखून. म्हणून केळीला हाताशी धरले आणि पर्यायाच्या वाटेवर निघाले. केळी तशी नाशवंत. म्हणून - अनेकदा प्रक्रिया केली आणि प्रयोगशाळेतील चाचण्यांद्वारे केळी पावडरच्या सहा महिन्यांच्या आयुष्यावर शिक्कामोर्तब केला. तिथेच त्यांनी 'बिस्किट' साकारले. केंद्र शासनाने केळीच्या बिस्किटला 'पेटंट'चा गोडवा वाहिला. तेव्हा गडे दाम्पत्य चॉकलेटसह अन्य खाद्यपदार्थ तयार केले. त्यांनी केळीच्या पिठावर प्रयोग सुरू केला. कच्ची केळी आणि पिकलेल्या केळीचा आयुष्यकाळाची तपासणी केली आणि त्यानंतर त्यांनी 'गुलाब जामून'चा गोडवा पेरण्यासाठी हात सरसावले.
दरम्यान कुसुम व अशोक गडे या दाम्पत्याने केळीच्या माध्यमातून पूरक उत्पादकांची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. त्यातून केळीच्या दरातील चढउतारामुळे येणाऱ्या चिंता मिटल्या आहेत. केळीच्या बिस्किटाला 'पेटंट' मिळविणाऱ्या या दाम्पत्याने आता केळीच्या पिठापासून 'गुलाब जामून' तयार केले आहेत. हे रसाळ गुलाब जामून खवय्यांच्या पसंतीला उतरले आहेत. याबाबत अशोक गडे म्हणाले की, केळीच्या पिठापासून तयार केलेले गुलाब जामून 'मैदा मुक्त आहेत. या गुलाब जामूनचा आस्वाद घेतल्यावर लहान मुलांच्या आतड्याला मैदा चिकटण्याची भीती नाही. तसा एकही घटक यात नसल्याचे ते म्हणाले.
प्रयत्न ठरले रसाळ
केळीच्या पिठाचे आयुष्य साधारणतः ६ महिन्यांचे, वाळलेल्या केळीच्या तुकड्यांचे एक वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असते. दर २-३ महिन्यांनी केळीचे तुकडे सूर्यप्रकाशात घातल्यास नक्कीय दीर्घकाळासाठी पौष्टिक ठरते. म्हणून तयार केलेल्या केळीच्या पिठात, दूध किंवा दुधाची पावडर घातल्यावर - त्यांनी पीठ तयार केले. त्यांचे। छोटेछोटे गोळे तयार करून ते तुपात तळले. त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवून त्यांना रसाळ गोडवा वाहिला. आधी घरात केलेल्या या प्रयोगाने 'गडे' कुटुंबातला प्रत्येक सदस्य 'कायं छान गडे म्हणत गेला. तिथेच गडे दाम्पत्याचा प्रवास नवनिर्मितीच्या गोडधोड रंग उधळून गेला.