- मुखरू बागडे
Vegetable Farming : परिवर्तनाची जिद्द मनात बाळगून धान शेतीला भाजीपाला (Vegetable Farming) व फळ बागायतीचा नवा यशस्वी पर्याय शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. धानपट्ट्यात भाजीपाला व फळबाग शेतकऱ्यांना नव्या आशेचे किरण देत आहे. एक एकराच्या कारले बागेत तोडा ३५६ किलोचा मिळाला. ५० रुपयांपर्यंतचा भावसुद्धा मिळाला. दोन महिन्यांत चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
ही यशोगाथा आहे दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रगतशील महिला शेतकरी सरिता सुनील फुंडे (Sarita Funde) यांची. धान पिकाने शेतकरी उन्नती करू शकत नाही. त्याला भाजीपाला व फळबागेची नितांत गरज आहे. त्याकरिता सरिता फुंडे यांनी स्वतःच्या शेतात स्वतःच प्रयोग करीत इतर शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे. याकरिता कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत आहे.
या महिला शेतकऱ्याने एक एकर जागेत कारले, दीड एकर जागेत वांगे, अर्धा एकर जागेत चवळी व एक एकर जागेत कोहळा लावलेला आहे. वांग्याचे सुद्धा उत्पन्न सुरू असून भाव ५०-६० रुपये किलोपर्यंत मिळत आहे. चार दिवसांनंतरच्या तोड्याला ७०० किलोपर्यंतचा उतारा मिळाला आहे. तर चवळी अत्यल्प प्रमाणात पहिल्या तोड्याची सुरुवात झालेली आहे. त्यालाही ४०-५० रुपयांचा चा दर मिळत आहे. हप्त्याला ६९ ते ७५ हजार रुपयांचे उत्पन्न हाती येत आहे.
नगदी उत्पन्न देणार!
होय, आज असणारा भाव पुढे दोन महिने नियमित मिळाल्यास एक एकरातील कारले नक्कीच चार लाखांचे उत्पन्न देईल, अशी आशा आहे. कारले पिकाला अजून एकही फवारणी झालेली नसून बाग हिरवीकंच व फुलोऱ्यावर आहे. सेंद्रिय खताचा वापर अधिक आहे. त्यामुळे खर्चात बचत होत असून नफ्यात वाढ शक्य आहे.
वांगीही करणार मालामाल...
सद्यस्थितीत असलेला ४० ते ६० रुपये दर वांग्याला कायम राहिल्यास निश्चितच वांगा उत्पादकांनासुद्धा नवी भरारी घ्यायला अडचण उरणार नाही. दीड एकरातील वांगी व अर्ध्या एकरातील चवळी यातून ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती येईल. अॅपलबोर, लिंबू, आंब्या ची लागवड केली आहे. पुढच्या हप्त्यात फणस वांगी पिकात आंतरपीक म्हणून लागवड नियोजित आहे. 66 धान पिकाला भाजीपाला व फळबाग नवा पर्याय फलदायी ठरला आहे. बागेत दररोज ८ ते १० मजुरांना काम देत असल्याचे समाधान आहे. दररोज बरेच शेतकरी बागेला भेट देत आहेत. भाजीपाल्याची शेती फळबागेसहित नफ्याची ठरणारी आहे. - सरिता सुनील फुंडे, प्रगतशील शेतकरी