Join us

गाेंदियाचा आनंद सुरपाम याला ‘दशरथ मांझी’ नाव का पडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 3:46 PM

चक्क हातात टिकास घेतली अन् दीड एकर शेत खोदून काढत ‘दशरथ मांझी’ अशी नवी ओळख गावकऱ्यांनी दिली.

रंजित चिंचखेडे

घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शेतीची कामे यंत्राच्या साहाय्याने करण्यात अडचण येत आहे. घरात खायचे वांदे आहेत, पैसा नाही. परंतु संघर्ष करण्याची ताकद शरीरात आहे. चक्क त्याने हातात टिकास घेतली अन् दीड एकर शेत खोदून काढत ‘दशरथ मांझी’ अशी नवी ओळख गावकऱ्यांनी दिली. गोंदिया जिल्ह्यातील गोंडीटोला येथील आनंद सीताराम सुरपाम अशा या आजच्या दशरथ मांझीचे नाव आहे.

दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात ८० नागरिक आदिवासी समाजाचे आहेत. भूमिहीन असल्याने त्यांनी झुडपी जंगल असणाऱ्या वन विभागाच्या जागेत अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाच्या यादीत आनंद सीताराम सुरपाम यांचेही नाव आहे. आनंदच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, सून आणि नातवंडे आहेत. मुले घराच्या बाहेर राहत असल्याने उदरनिर्वाहाची सर्वस्वी जबाबदारी आनंदच्या खांद्यावर येत आहे. वनहक्क समितीमार्फत त्यांनी मालकी पट्टे प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहे. ३ एकर जागेत सुरुवातीपासून उत्पादन घेण्याचे प्रयत्न त्यांनी केले. गतवर्षात या शेतीत तूळ, तीळ उत्पादन घेतले. 

शेती उपजाऊ करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. या तीन एकर शेतीला उपजाऊ करण्याचा प्रयत्न त्यांनी महिनाभरापूर्वी निर्णय घेतला आहे. शरीरात शक्तीचे बळ, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्याच्या चिंतेने आनंदने हातात टिकास घेतली. घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने यंत्राच्या साहाय्याने शेतीची मशागत करता येत नाही. मुले बाहेर शहरात असल्याने शेतीच्या कामात मदत करीत नाही. शेतीला पडीक ठेवता येत नाही. शिक्षित तरुणांच्या तोंडातून आनंदने बिहार राज्यातील दशरथ मांझीची टेकडी तोडून रस्ता निर्माण केल्याची माहिती ऐकली होती. या माहितीने प्रेरणा घेतली. 

दरम्यान शरीरात ताकदीचे बळ असल्याने आनंदने महिनाभरापूर्वी हातात टिकास घेतली. चक्क दीड एकर शेत टिकासीने खोदून काढले आहे. उर्वरित शेत खोदून काढण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहे. संपूर्ण ३ एकर शेत टिकासने खोदून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामात संपूर्ण शेतीत धान पिकाची रोवणी करणार असून, सुरुवातीपासून स्वतःच्या संघर्षातून शेतीला उपजाऊ करण्याचे प्रयत्न केले आहे. आधी धुरे निर्मित केले, नंतर दीड एकर शेत टिकासने खोदून काढले आहे. हिंमत खचू न देता संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत करणार सन्मान हिंमत खचून न जाता आनंद सुरपाम यांनी दीड एकर शेत टिकासीने खोदून उपजाऊ केले आहे. घरात अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही ते खचले नाहीत. स्वतःच्या संघर्षातून शेत तयार केले. एक रुपयाही खर्च केला नाही. आजचा दशरथ मांझी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सुरपाम यांचे कार्य आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती सरपंच शीतल चिंचखेडे यांनी दिली.

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीगोंदियाशेतकरीमहाराष्ट्र