Join us

Success Story : दुर्गम भागातील महिलांची यशोगाथा, 200 रुपयांच्या बचतीतून उभारला मसाला उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 7:52 PM

Women Success Story : महिलांनी मसाले उद्याेग (Masala Industry) उभारून समूहातील महिलांना राेजगार उपलब्ध करून दिला आहे.

गडचिराेली : ग्रामीण भागात राेजगाराच्या संधी तशा अत्यल्पच. अनेकजण बाहेर मजुरी किंवा विविध कामांसाठी भटकंती करतात; परंतु भटकंती न करता गावातच एखादा लहानात लहान उद्याेग किंवा व्यवसाय सुरू केला तर राेजगार मिळेल, याच भावनेतून गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथील महिलांनी भारत उत्पादक गटाच्या माध्यमातून मसाले उद्याेग (Masala Industry) उभारून समूहातील महिलांना राेजगार उपलब्ध करून दिला आहे.

गेवर्धा येथे १४ मार्च २०२१ राेजी महिलांनी एकजूट करून उत्पादक गटाची (Women Bachat Gat) स्थापना केली. सुरूवातीला गटाच्या आर्थिक बळकटीकरणासाठी २०० रुपये स्वनिधी गाेळा केला. महिलांना राेजगार उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण जीवनाेन्नती अभियानांतर्गत (UMED) बॅंकेकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले.

या कर्जाच्या रकमेतून त्यांनी मसाले तयार करणे व पॅकिंग करण्यासाठी मशीन खरेदी केल्या. या मशीनद्वारे सध्या त्या मसाले तयार करून विक्री करत आहेत. परिसरातील किराणा दुकानांमध्ये तसेच आठवडी बाजारातसुद्धा मसाल्यांची विक्री करत आहेत. याद्वारे लहानात लहान उद्याेग उभारून महिला आत्मनिर्भरतेकडे वळल्या आहेत.

समारंभांमध्येही सेवाभाेजनावळीसंबंधी विवाह, नामकरण तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये मसाल्यांच्या पदार्थांचा पुरवठा करणे, तसेच लसूण, कांदे पेस्ट तयार करून देणे आदी सशुल्क सेवा भारत उत्पादक गटातील महिला करत आहेत. याशिवाय त्यांनी आता पापड तयार करण्याचे मशीनसुद्धा आणलेले आहे.

उत्पादक गटाच्या माध्यमातून खडे मसाले तसेच मसाले पॅकिंग करून विक्री केली जात आहे. या उद्याेगाद्वारे गटातील १६ महिलांना एकप्रकारचा आर्थिक आधार मिळाला आहे. गटातील महिला एकजुटीने काम करत आहेत.- माेहनमाला ओमप्रकाश रामटेके, अध्यक्ष, भारत उत्पादक गट

टॅग्स :शेतीगडचिरोलीमहिलाशेती क्षेत्र