नाशिक : तरुणवर्ग शेतीकडे न वळता गावाची वाट सोडून शहराकडे स्थलांतरित हाेत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यातही शेतकरी पारंपरिक शेती सोडून शेतीचे नवीन तंत्र अवगत करताना फारसे दिसत नाही. नांदगाव तालुक्यातील (Nandgoan) जामदरी येथील अवघ्या २८ वर्षीय युवा शेतकऱ्याने मात्र शेतीला (Sericulture Farming) आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कमी खर्चातील धागा तयार करणारी रेशीम शेती साकारली.
गेल्या काही वर्षात नाशिक जिल्ह्यात (Nashik District) रेशीम शेतीला चालना मिळत आहे. त्यातही तरुण शेतकऱ्यांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून येते. नाशिकच्या दुष्काळी पट्टा म्हणून नांदगाव तालुक्याची ओळख आहे. याच नांदगाव तालुक्यातील युवा शेतकऱ्याने दोन एकर शेतजमीन भाड्याने घेऊन रेशीम शेती फुलविली. कांदा, मका व कापूस फुलणाऱ्या शेतात आता रेशीम शेतीच्या माध्यमातून महिन्याला एक लाखाचे उत्पन्न हा तरुण शेतकरी घेत आहे. महेश शेवाळे असे या प्रयोगशील युवक शेतकऱ्याचे नाव आहे. संपूर्ण नांदगाव तालुक्यात फक्त त्याच्याच शेतात रेशीम शेती फुलली आहे.
बी. कॉम. झाल्यावर सोबतचे मित्र नाेकरीसाठी शहराकडे वळाले. महेशने मात्र शेतीत लक्ष घातले. त्याच्या कुटुंबीयाची १५ एकर बागायत शेती आहे. तेथे तेच ते पीक घेतले जात होते. रेशीम शेतीसाठी त्याने विचारणा केली असता ही शेती कामाची नाही, जमणार नाही, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, मला फक्त दोन एकर शेती भाड्याने द्या, असे त्याने सांगितले अन् मोठ्या हिमतीने त्याने दोन एकर जागेत एक महिन्याचे पीक असलेले रेशीम शेती फुलविली.
एक लाखाचे उत्पन्नजूनमध्ये पहिल्याच महिन्यात त्याने दोन एकरातून एक लाखाचे उत्पन्न घेतले. जून ते मार्चमध्ये प्रत्येक महिन्यात प्रत्येकी एक लाखाचे उत्पन्न घेतले. शेती पूर्ण झाल्यावर कोष तयार होतो. त्यापासून नंतर धागा तयार होतो. नाशिक जिल्ह्यात खूप कमी प्रमाणात रेशीम शेती केली जाते. मात्र मला कृषि विभाग तसेच, उपसंचालक जगदीश पाटील यांनी दिलेल्या पाठबळानंतर प्रोत्साहन मिळाले असल्याची माहिती या तरुण शेतकऱ्याने दिली. अनेकजण ही शेती पाहण्यासाठी येत असल्याचेदेखील ते म्हणाले. शेतीसाठीचे थकीत अनुदान देण्याची मागणी त्याने केली.
७० ते ९० हजार कीटकशासनाने रेशीम शेती वाढावी यासाठी अनुदानही जाहीर केले असून कमी खर्चातून जास्त उत्पन्न देणारी शेती म्हणून याकडे पाहिले जाते. शेतीसाठी रेशीम कीटक (अळ्या) घ्याव्या लागतात. दोन एकर शेतीसाठी एका वेळेस साधारण ७० ते ९० हजार कीटक आणाव्या लागतात.