आयुब मुल्ला
खोची : योग्य नियोजन अन् वेळच्या वेळी मशागत केली, तर मुरमाड शेत जमिनीत उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते, हे लाटवडे येथील उद्योजक शंकर पाटील यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
गुंठ्याला तीन टन उत्पादन घेण्यात त्यांना यश आले आहे. जाड पेरी असलेला लांबलचक वजनदार ऊस तीन ते चार ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागत आहे. एकसारखा तीन एकरातील हा ऊस ३६० टन उत्पादन देणारा ठरणार आहे.
शंकर पाटील यांनी तीन एकरात आडवी उभी नांगरट करून रोटर मारून साडेचार फूट सरी सोडली. लागण करण्यापूर्वी रासायनिक खतांची मात्रा दिली. जुलैमध्ये ८६०३२ या जातीची बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची लावण केली. आठव्या दिवशी आळवणी दिली.
उगवण जोमाने झाली. एक महिन्याने फुटव्यांची संख्या वाढावी यासाठी खतांचा डोस दिला. जीवाआमृताची मात्रा ड्रीपद्वारे दिली. साठ दिवसांनी बाळभरणी, तर १० त्यानंतर एकरी ४२ हजार ऊस राहावेत, यासाठी अतिरिक्त ऊस काढून घेतले.
उसाची संख्या मोजून घेतली. सलग चार वेळा जीवाअमृत ड्रीपद्वारे दिले. झपाट्याने उसाची वाढ होत गेली. त्यानंतर पावसाळी डोस दिला.
ड्रोनद्वारे टॉनिक व तणनाशक फवारणी केली. ५० ते ५५ पेरी असलेला ऊस तयार झाला. यासाठी ऊस शेती तज्ज्ञ सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. दिवसांनी पक्की भरणी केली.
एक ऊस तीन किलोचा
- आता उसाची तोडणी सुरु झाली आहे. तीन ते चार ठिकाणी तोडून मोळी बांधावी लागते.
- एका उसाचे वजन तीन किलो आहे. सुरुवातीच्या वीस गुंठ्यातील वजन ६५ टन आले.
- त्यामुळे तीन एकरांत ३६० टन ऊस उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे.
- त्यानुसार सुमारे ११ लाख ८८ हजार रुपयांपर्यंचे उत्पादन मिळेल.
- २ लाख १० हजार रुपये खर्च आला आहे, म्हणजे किमान ९ लाख ७८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.