चंद्रकांत गायकवाड
तिसगाव परसदारी गाय म्हणजे सार्वत्रिक समृद्धी, कुटुंबातील व्यक्तींच्या आयुरारोग्याला बळकटी असा आजोबांचा मूलमंत्र श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील वर्षा संजय मरकड या मुलीने मनस्वी जपला आहे.
एमबीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात मिळणाऱ्या मोठ्या पॅकेजच्या नोकरीकडे पाठ फिरवून वर्षा हिने गोवंश संवर्धन वाढवीत त्यातून मिळणाऱ्या शेण, गोमूत्रापासून उपपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
देशी गायींचे संगोपन करीत दोनशे गायींची गोशाळा चालवीत त्याला उद्योगाचा आकार तिने दिला आहे. पर्यावरण रक्षण, प्रदूषण निर्मूलन, सकस आहारातून शतायुषी पिढीची निर्मिती व्हावी यासाठीची ग्रामीण तरुणीची ही झेप सार्वत्रिक कौतुकाची ठरत आहे. गावरान गायीचे शेण, तूप, दही, ताक, गोमूत्र म्हणजे आयुरारोग्य वृद्धीचा प्रवाही मंत्र मानला गेला आहे.
या महतीला आयुर्वेद दुजोरा देते. यातूनच शेणापासून पणत्या, धूप, अगरबत्ती, जळाऊ पावडर, गांडूळ खत, सेंद्रिय खत, गोवऱ्या, शेणाच्या विटा यासारखे दिसणारे लाकडी ठोकळे निर्मितीचा प्रवास सुरू झाला.
गोमूत्राच्या चिकित्सेच्या माध्यमातून सर्वांगीण अभ्यास करून औषधी निर्मिती करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असा विश्वास वर्षा मरकड हिने व्यक्त केला. दवणा अगरबत्तीला नाथ संप्रदायिकांत मोठी मागणी आहे.
हे उत्पादन घेण्यासाठी शेणाची पावडर तयार करण्याचे संयंत्र बसविल्याने धूप अगरबत्तीचे उत्पादन या गोशाळेत वाढले आहे. 'मेरी माटी, मेरा देश' अशी शासनाची घोषणा हाच संदेश ध्वनित करते.
मुलीचा हट्ट पाहून वर्षाचे वडील संजय मरकड यांनीही आर्थिक सहभाग लावीत विविध यंत्र हाताळण्यासाठी सात कामगार मदतीला दिले आहेत. आई, भाऊ, भावजयी असे घरातील सदस्यही मदतकार्यात सहभाग देत असल्याचे वास्तव चित्र आहे.
शतायुषी होण्यासाठी पूरक भूमिका निभावणाऱ्या गायींचे संवर्धन स्पर्धेच्या युगाची गरज आहे. रासायनिक खतांमुळे रोगकिडींचे वृद्धीसह उत्पादित मालाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह कायम आहे. रोगी जनजीवन, पोतहीन शेती बदलण्यासाठी सेंद्रिय शेती अन् पर्यायाने गोसंवर्धनाची कास धरावी लागणार आहे. - वर्षा मरकड, उद्योजक तरुणी