आजपर्यंत आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने शेती होतानाच आपण पाहत आलोय. एकच पीक पद्धत, लागवड, सिंचन प्रकार हे आपल्यासाठी नवीन नाहीत. मात्र, या पारंपरिक शेतीला बगल देत, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आयटी क्षेत्रात चांगले करिअर असतानाही नांदेड शहराजवळील पावडेवाडी येथील मंजुषा व गुलाब पावडे या दाम्पत्याने जवळपास दोनशेहून अधिक आजारांना प्रतिबंधक करण्याची क्षमता असलेल्या ऑरगॅनिक मोरिंगा (शेवगा) पावडरच्या निर्मितीला सुरुवात केली.
आयटी क्षेत्रात अभियंते असलेल्या मंजुषा आणि गुलाब पावडे यांनी नामांकित कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळले. त्यांच्याकडे वडिलोपार्जित जवळपास दहा एकर शेती आहे. पूर्वी या शेतीत वडिल पारंपरिक पीक घ्यायचे. मात्र, मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती असायची. त्यानंतर, पावडे दाम्पत्यांनी या पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत, शेवगा शेती करण्याचा निर्णय घेतला. केवळ शेवगा विक्रीतून उत्पन्न घेण्याच्या हेतूने शेवगा शेती न करता, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, शेवग्याच्या पानापासून पावडर निर्मिती सुरू केली. या पावडरला सध्या चांगली मागणी आहे.
शेवगा पावडर निर्मितीची प्रक्रिया पद्धत
लागवडीनंतर सुमारे तीन महिन्यांनंतर पावडर बनविण्यायोग्य पाला उपलब्ध होतो. प्रति दिवस जवळपास दोन क्विंटल पाला उपलब्ध होतो. हा पाला मीठ व कडुनिंबाच्या द्रावणात स्वच्छ करून, दोन- तीन दिवस सावलीत वाळू घातल्यानंतर पावडर बनविण्यासाठी 'मिनी ग्राइंडर'चा वापर केला जातो.
विविध आजारांना करते प्रतिबंध
कॅन्सर, मधुमेह, उच्च रवत्तदाब, पचनक्रिया, यकृत, त्वचा, शुगर, किडनीस्टोन, केस वाढ, बध्दकोष्ठता, जखम, मानसिक स्पष्टता आदी आजार आणि समस्यांसह दोनशेहून अधिक आजारांना प्रतिबंध करण्यास मोरिंगो (शेवगा) पावडर फायदेशीर आहे. हे पावडर गुणकारी असल्याने डॉक्टरांकडून देखील त्यास अधिक मागणी आहे.
सेंद्रीय शेतीकडे वळावे
शेती क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध, तरुणांनी केवळ डोळसपणे याकडे बघून आणि काळाची गरज ओळखून सेंद्रीय शेती केली तर त्यांना चांगले उत्पन्न घेता येईल. नवनवीन पिक पद्धतीचा अवलंब करावा. केवळ शेवग्यापासून ऐशी प्रकारच्या वस्तू बनवता येतात. त्यामुळे अधिकाधिक शेतकयांनी या शेती व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. महिन्याकाठी दीड ते दोन लाखांचा निव्वळ नफा सध्या मिळत आहे.- मंजुषा गुलाब पावडे, उत्पादक शेतकरी
पाल्यापासून ऑरगॅनिक पावडर निर्मिती
शेवगा शेतीला जोड म्हणून शेवग्याच्या पाल्यापासून ऑरगॅनिक पावडर निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. सेंद्रिय पद्धतीने रोपांची जोपासना केली. शेवग्याच्या शेंगापेक्षा या प्रक्रियेला कमी कालावधी लागतो तसेच पावडर निर्मितीच्या व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळते.