अविनाश पाईकराव
पाच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करून कोरोनामुळे घरी परतलेल्या तरुणाने हताश न होता स्वतः च्या हिमतीवर काहीतरी करून दाखविण्याचा निर्धार करून वडिलोपार्जित माळरानावरील पडीक जमिनीची मशागत करून त्यात फळबाग फुलवली.
आज त्याच फळबागेच्या माध्यमातून तरुणास लाखो रुपयांचा निव्वळ नफा तर मिळतोय. शिवाय आठ ते दहा बेरोजगारांच्या हाताला कामही मिळत असल्याने त्याने बेरोजगारीवर मात करून इतरांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
नंदकिशोर गायकवाड असे प्रयोगशील या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी या गावचा आहे. सुरुवातीला अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठले.
चार- पाच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी केली तेच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर तेथे निभाव लागणे शक्य नसल्याने थेट गाव गाठण्याचा निर्णय त्याने घेतला अन् खचून न जाता शेती करण्याचा निर्धार या तरुणाने केला.
त्यानंतर त्याने त्याच्या वडिलोपार्जित डोंगराळ जमिनीत शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातील दोन एकवर त्याने उसाची लागवड केली. पहिल्याच प्रयत्नात त्याला १६० टन उसाचे विक्रमी उत्पादन झाले. त्यानंतर त्याने डोंगराळ जमिनीत अंबा, जांभूळ, पेरू, फणस यासह जापान आणि थायलंडचा अंबा, उन्हाळ्यात येणारे सफरचंद, जापान, मलेशियातील पेरू, काळे आणि पांढऱ्या रंगाची जांभळं, फणस, मसाल्यासाठीचे दालचिनी, इलायची, लवंग लागवड आदी फळ पिके लागवड केली.
यामध्ये नंदकिशोर यांस यश आले असून, फळ विक्री आणि रोप विक्रीतून त्याने वर्षाकाठी ३५ लाखांचे उत्पन्न घेतले असून खर्च वजा जाता त्याला २५ लाखांचा नफा मिळाला आहे.
देश-विदेशातून फळाला मागणी
मागच्या तीन वर्षांपासून डोंगराळ जमिनीत सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून फळ लागवडीचा प्रयोग केला. मागच्या दोन वर्षांपासून फळाचे उत्पादन होत असून त्याला आजूबाजूच्या राज्यातून मागणी वाढली आहे. शिवाय सौदी अरब, कतारमधूनही फळाला मागणी आली आहे. यावर्षीचा माल जागेवरच विक्री झाला. पुढील वर्षी विदेशातही माल निर्यात करण्याचा मानस आहे. तरुणांनी खचून न जाता फळ शेतीकडे वळावे - नंदकिशोर दिगंबर गायकवाड रा. भोसी ता. भोकर
या फळ झाडांची लागवड
आंबा - १२०० (जापान, थायलंड), सीताफळ - १३०० (तीन व्हेराईटी), पेरु - ३५०० (रेड डायमंड पेरु, मलेशिया), जांभूळ - १०० (पांढरा जांभूळ, काळे जांभूळ), लिंबोनी-४०० (बारमाही), सफरचंद- ४०० (उन्हाळी).
हेही वाचा - एकरात लाखोंची कमाई देणारी तूर भारी; ऊस, कपाशीला आता नको म्हणतोय शेतकरी