Join us

शासकीय नोकऱ्या सोडल्या अन् नवरा बायको रमले शेतीत; फुलवल्या फळबागा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 1:17 PM

रत्नागिरी तालुक्यातील पिरंदवणे येथील विजय कृष्णाजी बेहेरे यांना शेतीची आवड असल्याने, त्यांनी व त्यांच्या पत्नीने नोकरी सोडून बागायती फुलविली आहे. २० एकर क्षेत्रावर ते बारमाही शेती करत आहेत.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : तालुक्यातील पिरंदवणे येथील विजय कृष्णाजी बेहेरे यांना शेतीची आवड असल्याने, त्यांनी व त्यांच्या पत्नीने नोकरी सोडून बागायती फुलविली आहे. २० एकर क्षेत्रावर ते बारमाही शेती करत आहेत.

विजय बेहरे स्वतः केंद्र शासनात नोकरीला होते. त्यांच्या पत्नी अक्षता राज्य शासनाच्या नोकरदार, विजय यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी २३ वर्षे नोकरी केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. पतीच्या निर्णयाला प्रोत्साहन देत, अक्षता यांनीही स्वेच्छानिवृत्ती घेत, शेतीकडे लक्ष केंद्रीत केले. त्यांनी २० एकर क्षेत्रावर बागायती फुलविली आहे.

त्यामध्ये ५०० हापूस आंबा, २०० काजू, १०० सुपारी व ४० नारळ झाडांची लागवड केली आहे शिवाय १० गुंठे क्षेत्रावर भुईमूग व १० गुंठे क्षेत्रावर भाजीपाला लागवड करत आहेत. उत्पादन सुरू झाले असून, थेट विक्रीवर विशेष भर आहे.

बागेतील पालापाचोळा एकत्र करून कंपोस्ट व गांडूळ खत युनिट तयार केले असून, त्याचा वापर बागायतीसाठी करत आहेत. आपल्या उत्पादनाच्या दर्जामध्ये सातत्य ठेवले असल्याने विक्रीसाठी त्यांना विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत. प्रत्येक पिकाच्या व्यवस्थापनाबाबत विजय बेहेरे हे कृषीतज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे मार्गदर्शन घेत असतात.

'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीवर भरशासनाच्या 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्री पद्धतीचा अवलंब करत ग्राहकाशी संपर्क साधून विक्री करत आहेत. मुंबई, पुणे येथील ग्राहकांना दर्जेदार हापूस हवा असतो, त्यासाठी जादा पैसे मोजण्याची त्यांची तयारी असते. बेहरे दाम्पत्यांने नातेवाईक, मित्र यांच्या माध्यमातून हापूसची थेट विक्री सुरु केली आहे. चांगल्या उत्पादनामुळे बेहरे यांची स्वतंत्र ओळख झाली आहे.

आता तर ग्राहकच थेट संपर्क साधत असतात. थेट विक्रीमुळे ग्राहकांना चांगला, दर्जेदार माल मिळतो, शिवाय त्यासाठी रक्कमही ते मोजण्यास तयार असतात. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विक्री नसल्याने बेहेरे यांना त्याचा फायदा होत आहे. ओल्या काजूगरासह वाळलेली काजू बी, भाजीपाला, नारळ, सुपारीची विक्री करत असून त्याचा त्यांना फायदा होत आहे.

अधिक वाचा: आंबा लागवडीचा इस्रायली पॅटर्न देईल एकरी ८ लाखाचे उत्पन्न

शेताच्या बांधावरच विक्रीखरीप हंगामात दहा गुंठे क्षेत्रावर भात लागवड केली जाते. भात काढणीनंतर भाजीपाला व स्वतंत्र दहा गुंठे क्षेत्रावर भुईमूग लागवड करत आहेत. मूळा, माठ, कोथींबीर, वांगी, मिरची, पावटा या भाज्यांची लागवड करत आहेत, भाज्यांची विक्री शेतावरच होत आहे. भुईमुगाचेही चांगले उत्पन्न येत असून त्यापासून ते तेल काढून घेत आहेत.

नारळाचे दर चांगले असल्यामुळे गावातच विक्री होते. सुपारी मात्र चांगला दर पाहून विक्री करत आहेत. बारमाही शेतीतून उत्पन्न मिळवत असतानाच त्यांच्याकडे पाच ते सहा मजुरांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. लागवडीसाठी बियाणे, खत, पाणी व्यवस्थापन तसेच काढणी व विक्री यासाठी विजय बेहेरे स्वतः परिश्रम घेत आहेत.

शेतीची आवड सुरुवातीपासून त्यामुळे काही वर्षे नोकरी करून नंतर शेतीमध्ये लक्ष केंद्रीत केले. पत्नीचीही साथ भक्कम मिळाली. त्यामुळे मी बारमाही शेती करत आहे. व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून शेती करत असल्याने त्याचा फायदा झाला आहे. हवामानातील बदलांचा परिणाम पिकावर होत असला तरी बारकाईने अभ्यास करून, शेतीतज्ज्ञांचे मार्गदर्शन करून उपाययोजना करत आहे. सेंद्रीय खतांचा सर्वाधिक वापर करत असल्याचा फायदा झाला आहे. - विजय बेहेरे, पिरंदवणे

टॅग्स :शेतकरीरत्नागिरीफलोत्पादनआंबाफळेशेतीपीक व्यवस्थापनसेंद्रिय खत