Join us

Farmer Success Story: मुंबईला केला राम राम धरली गावाची वाट अन् रेशीम शेतीत केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 9:56 AM

राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील हनुमंत विचारे यांनी शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधत नोकरीपेक्षा अधिक यशस्वी करून दाखवला आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी: नवोदय विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण, मुंबईत जाऊन इंटेरियर डिझायनर्सचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर साहजिकच चांगल्या पगाराची नोकरी चालून आली. पण मुंबईला राम राम करून गावाची वाट धरली.

राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील हनुमंत विचारे यांनी शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधत नोकरीपेक्षा अधिक यशस्वी करून दाखवला आहे. हवामानातील बदलाचा पिकावर परिणाम होतो, वन्य प्राण्यांचा उपद्रव त्रासदायक ठरतो. परंतु कुढत न बसता हनुमंत विचारे शेती करत असतात. त्यामध्ये नावीन्यपूर्व प्रयोगही करत आहेत.

पावसाळ्यात भात, हळद, काकडी, मिरची तसेच ऊस तर उन्हाळ्यात कलिंगड, कोबी, फ्लॉवर, मका लागवड करून उत्पन्न मिळवत आहेत. या शेतीच्या जोडीला तुती लागवड करून नावीन्यपूर्ण रेशीम शेतीही केली आहे. अर्जुना नदीच्या काठालगत दीड एकर क्षेत्रावर तुती लागवड केली आहे.

जिल्ह्यात पावसावर शेती केली जाते, त्यानंतर जमिनी पडीकच राहतात. मात्र हनुमंत यांनी पावसावर शेती करत असतानाच गावातील पडीक जमिनी भाड्याने घेत उन्हाळ्यात पिकाखाली आणल्या आहेत. नियोजनपूर्वक, अभ्यासपूर्वक पिकांची लागवड करत आहेत.

आंबा, काजू, नारळी, पोफळीची बागायत असली तरी कोकणच्या लाल मातीत रेशीम शेतीचा प्रयोगही यशस्वी केला आहे. राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गट स्थापन केला असून रेशीम शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. शेतीतील तंत्रज्ञानाची आदानप्रदान करत आहेत.

रेशीम शेती यशस्वीहनुमंत यांनी गतवर्षी २० अंडी पुंजमागे ४८० काऊंट असलेल्या ए ग्रेडची २२ किलो रेशीम कोष निर्मिती केली होती. त्यांनी केलेल्या रेशीम कोशाची चांगली निर्मिती असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षीही ए ग्रेड कोष निर्मिती परंपरा कायम ठेवत भविष्यात रेशीम शेतीचा विस्तार वाढविण्याचा हनुमंत यांचा मानस आहे.

पडीक जमीन लागवडीखालीगोठणेदोनिवडे गावातील भातशेतीनंतर पडीक राहणाऱ्या जमिनीवर लागवड करून ओलिताखाली आणल्या आहेत, कलिंगड, कोबी, फ्लॉवर, मका लागवड करीत आहेत. कलिंगडाचे 'अगस्ता' वाणाची लागवड केली असून १४ किलो वजनाचे कलिंगड घेण्यात त्यांना यश आले आहे. शेणखत, गोमूत्राचा वापर शेतीसाठी करत आहेत. त्यामुळे जमिनीचा कस व पोत टिकून राहण्यास मदत होते. शिवाय पिकाची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. आई, वडील, भाऊ तसेच मित्र परिवाराच्या मदतीने हनुमंत शेती करत आहेत. गेली पाच वर्षे ते सहा एकर क्षेत्रावर ऊस लागवड करून उत्पादन घेत आहेत.

आई-वडील शेती करत असल्याने लहानपणापासून पाहत होतो. त्यांच्यामुळेच माझ्यामध्येही शेतीची आवड निर्माण झाली. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची संधी सोडून गावी आलो. शेतीचे ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित केले. वाचन, मार्गदर्शन मेळावे, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतीबाबत अधिकाधिक ज्ञान मिळण्याचा प्रयत्न करतो. शिवाय त्याचा वापरही करतो. कुटुंबासह, मित्रपरिवाराचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे पडीक जमीन लागवडीखाली तर आली, शिवाय कोकणच्या लाल मातीत विविध पिके घेता येतात, हे सिद्ध करण्यात यश आले. - हनुमंत विचारे, गोठणेदोनिवडे, ता. राजापूर

अधिक वाचा: कॅन्सर आजारावर फायद्याच्या तांदूळाची गुळसुंदेत होतेय शेती; मिनेश यांच्या थायोमल्ली जस्मीन राइसची चर्चा भारी

टॅग्स :शेतकरीशेतीरेशीमशेतीभाज्यारत्नागिरीकोकणनोकरीमुंबई