Join us

कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन देणारं गवती चहाचे पिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:19 PM

बिऊर (ता. शिराळा) गावाची आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त शेतकरी गवती चहाची लागवड करीत आहेत. येथील शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करून मुंबई मार्केटमधे अल्पावधीत ओळख झाली आहे.

विकास शहाशिराळा : बिऊर (ता. शिराळा) गावाची आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त शेतकरी गवती चहाची लागवड करीत आहेत. येथील शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करून मुंबई मार्केटमधे अल्पावधीत ओळख झाली आहे. अल्पभूधारक व शेतीवर उदरनिर्वाह असणारे शेतकरी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळत असून नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अलीकडच्या काही वर्षांत वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता अशा अनेक कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्षभर उत्पादन देणाऱ्या पिकाकडे कल वाढला आहे.

गवती चहा ही तृणवर्गीय वनस्पती असून एक बारमाही सुवासिक गवत आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी सुरू होते. त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करता येते. साधारणपणे वर्षात चार कापण्या होतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून या परिसरात काही शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायला सुरुवात केली आहे. अनुभव नसल्याने थोडाफार तोटाही सहन करावा लागला; मात्र नंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत व जिवाणू खतांचा वापर केला. गावखताचा मोठ्या प्रमाणात वापर व पाण्याचे नियोजन, वेळेवर आंतरमशागत, कीटकनाकांचा वापर, याची सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरुवात झाली.

मुंबई मार्केटमध्ये या तालुक्यातील अनेक व्यावसायिक आहेत. त्यामुळे येथे माल पाठवायला सुरुवात झाली. कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड केली आहे. यामुळे अनेकजण आवर्जून गवती चहा पितात. त्याचबरोबर यामध्ये जीवनसत्त्व 'अ' मोठ्या प्रमाणात असते. गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. सरासरी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळतो.

वीस टनापर्यंत उत्पादनलागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी ओडी-४४० सीकेपी-२५, आरआरएल-१६ या जातींची निवड करावी. लागवड ७५ सेंमी बाय, ७५ सेंमी अंतराने करावी. हेक्टरी २२ हजार कोंब लागतात. पहिल्या दोन वर्षांत हेक्टरी २० टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते.

शेतकरी कुटुंबीयांचे अर्थकारण सुधारलेकमी खर्चात चांगले पैसे मिळवून देणारे पीक म्हणून गवती चहाकडे पाहिले जात आहे. आमच्यासह सर्वसामान्य कुटुंबीयांचे गवती चहामुळे अर्थकारणच सुधारले आहे. हवामान चांगले असल्यामुळे फारसे औषध फवारणी करावी लागत नाही. कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे, म्हणूनच आम्ही या पिकाकडे वळलो आहे, अशी प्रतिक्रिया बिऊर येथील शेतकरी सचिन पाटील यांनी दिली.

टॅग्स :शेतकरीशेतीपीकसांगलीसेंद्रिय खतमुंबईबाजार