Join us

लिंबाला गावातच मिळाली बाजारपेठ, शेतकरी घेताहेत भरघोस उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 2:21 PM

उन्हाळ्याच्या दिवसात किलोला १०० रुपये भाव; रोज १५ टन लिंबू परदेशासह इतर राज्यात

नितीन कांबळे

पूर्वी हंगामी पिके घेऊन शेतकरी शेतीला प्राधान्य देत असत. शेतीविषयक हवे तेवढे ज्ञान अवगत नसल्याने ज्वारी, बाजरी, गहू व इतर कडधान्य शेतकरी घ्यायचे. कालांतराने तंत्रज्ञान अवगत झाले. कमी खर्चात व कमी पाण्यावर येणाऱ्या लिंबाच्या फळबागाकडे शेतकरी वळला. उन्हाळ्याच्या दिवसात लिंबाला १०० रुपये किलो दर मिळत असल्यामुळे लिंबाच्या बागा शेतकऱ्यांसाठी एटीएम झाल्या आहेत. आष्टी तालुक्यात ८०० हेक्टरवर लिंबाच्या बागा आहेत.

आष्टी तालुका तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय चांगला आहे. शेतीने दगा दिला तर दुग्धव्यवसाय त्यांना तारतो; पण पारंपरिक शेती किती वर्षे करायची. याला कुठे तरी नवीन जोड देऊन कमी पाण्यावर, कमी खर्चात व अल्प मेहनतीत शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन लिंबोणीची लागवड केली. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळत गेला; पण आज तालुक्यात ८०० हेक्टर क्षेत्रावर लिंबोणीच्या बागाआहेत.

गावातच बाजारपेठ उपलब्ध

लिंबाला गावात व शहरातच बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. घरात पैसा असो वा नसो बागेतील लिंबू मात्र आपले एटीएम असल्याचे बोलले जात आहे. व्यापाऱ्याकडे गेल्यावर माप होताच रोकडा पैसा हाती येत असल्याने शेतकरी लिंबोणीच्या बागेकडे वळाले आहेत.

वेळप्रसंगी विकतच्या पाण्यावर आम्ही बागा जगवतो. कारण खिसा रिकामा असला तरी बागा आमच्यासाठी एटीएम आहेत. पिशवीभर लिंबू तोडून व्यापाऱ्याकडे नेल्यावर खर्च आरामात भागतो. - रेवन्नाथ राऊत, लिंबू उत्पादक शेतकरी, चोभानिमगाव

लिंबाचे भाव

वर्ष २०२२- २०२३- २०२४- भाव १५० ते १७० १२५ ते १५० १०० ते १२०

आष्टीच्या लिंबाला परदेशात मागणी

आष्टीच्या लिंबाला थेट परदेशात मागणी आहे. नेपाळ येथील बाजारपेठेत लिंबू जाऊ लागले. दररोज १५ टन लिंबू इतर बाजारपेठेसह परदेशात जाते. दिल्ली, जयपूर, मुंबई, पुणे, नाशिक येथेही चांगली मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या लिंबाच्या फळांना चांगला भाव मिळत असून, याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.- सचिन वाघुले, व्यापारी

आष्टी तालुक्यातील शेतकरी आठ वर्षांपासून लिंबाच्या बागेकडे वळाले आहेत. लिंबाच्या बागासाठी पाणी, खर्च आणि मेहनत कमी आहे. हाती ताजा पैसा मिळत असल्याने शेतकरी याकडे वळाले आहेत. त्याच बरोबर कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन चांगल्याप्रकारे होत आहे. - गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :बाजारशेतकरी