पुणे जिल्ह्यातील हर्षद नेहरकर या तरूणाने आपल्या शेतात एकाचवेळी सात पिके घेण्याचा प्रयोग केला. शेतीमधील थोडीही जागा वाया न जाऊ देता दिसेल तिथे वेगवेगळ्या पिकांची लागवड करून शेतीच्या केवळ बांधावर लावलेल्या गवती चहातून महिन्याकाठी १ लाख रूपयांचा निव्वळ नफा हर्षद कमावतो आहे. २३ वर्षाच्या हर्षदने आपल्या प्रयोगातून इतर शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रहिवाशी असलेला हर्षद नेहरकर हा २३ वर्षाचा तरूण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्णवेळ शेती करू लागला. त्याने नारायणगाव येथे असलेल्या २५ एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड केली आणि त्यामधील जागा वाया जाऊ नये म्हणून त्याने वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिके घेतली.
दरम्यान, २५ एकर क्षेत्रामध्ये असलेल्या बांधावर त्याने गवती चहाची लागवड केली. गवती चहा आरोग्यदायी आणि फायदेशीर असल्यामुळे मागणी जास्त आहे. बाराही महिने गवती चहाची विक्री होत असल्यामुळे बाजारात गवती चहाला चांगला दर मिळतो. त्याचबरोबर यासाठी जास्त काळजी घेण्याची गरज नसते. यामुळे बांधावरील जागा पडीक राहण्यापेक्षा तिच्यापासून उत्पन्न मिळते.
व्यवस्थापन
गवती चहा बांधावर लावल्यामुळे त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असं हर्षद सांगतो. पण अधून मधून फवारणी करावी लागते. त्याचबरोबर पाण्यासाठी ठिबकचे दोन पाईप बांधावर सोडले आहेत. यामुळे उत्पादन खर्च कमी लागतो.
विक्री
जुन्नर तालुक्यातील अनेक खासगी खरेदीदार किंवा मॉलचे कलेक्शन सेंटर आहेत. त्यामुळे हा माल कलेक्शन सेंटरच्या माध्यमातून थेट मॉलमध्ये आणि सुपर मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. हर्षद यांच्याकडून खरेदीदार दररोज गवती चहाची खरेदी करतात. तर प्रतिकिलो ३८ ते ८० रूपयांच्या दरम्यान दर मिळतो.
उत्पन्न
प्रत्येक दिवशी ५० ते ८० किलो गवती चहाची विक्री केली जाते. तर सर्वांत कमी वजन आणि सर्वांत कमी दर विचारात घेतला तरी महिन्याकाठी १ लाख २० हजार रूपयांचे उत्पन्न यातून हर्षद यांना मिळते. तर मजूर, फवारणी, व्यवस्थापन आणि पाण्याचा खर्च वजा केला तर साधारण महिन्याकाठी १ लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळतो.
आंतरपिकांतून समृद्धी
हर्षद यांनी आपल्या संपूर्ण शेतामध्ये आंतरिपके घेतली आहेत. डाळिंबाच्या पिकामध्ये एकाचवेळी त्यांनी तब्बल ७ पिके घेण्याचा विक्रम केला आहे. डाळिंब पिकामध्ये घेतलेल्या आंतरपिकांच्या माध्यमातून ते दोन वर्षांमध्ये एकरी ६ लाख रूपयांचा निव्वळ नफा कमावणार आहेत.