भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताच्या कृषी क्षेत्रात अनेक संशोधकांनी, नेत्यांनी, शास्त्रज्ञांनी योगदान दिले आहे. सरकारकडून अनेक योजना, प्रकल्प शेतीच्या उत्थानासाठी राबवल्या जातात. त्यासाठी शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची मोठी यंत्रणा काम करत असते. त्याचबरोबर शेतीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अनेक सरकारी अधिकारी, संशोधक, शास्त्रज्ञ काम करत असतात पण त्यांचे कार्य, त्यांचा प्रवास आपल्या समोर येत नाही. लोकमत अॅग्रोच्या कृषीदूत या सिरीजच्या माध्यमातून आपण अशा अधिकाऱ्यांचा प्रवास, त्यांचे कार्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातील फलोत्पादन संचालक कैलास मोते यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. ते जवळपास मागचे ३२ वर्षे प्रशासकीय सेवेत असून त्यांनी कृषी विभागाच्या अनेक पदांवर आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी काम केले आहे. बीड जिल्ह्यातील पारधी या भटक्या समाजातील ज्या लोकांकडे शेती आहे अशा लोकांना शेतीसाठीच्या योजनांचा लाभ मिळवून देत त्यांना शेती व्यवसायात स्थिरस्थावर करण्याचे मोठे काम मोते यांच्या प्रयत्नामुळे झाले आहे.
प्रवास
कैलास मोते हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९९१ साली वर्ग १ या पदावर भरती झाले होते. कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद बीड), विभागीय मृद संधारण अधिकारी जळगाव, उपविभागीय जिल्हा अधिकारी, शहादा, जि. नंदुरबार, कृषी उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नाशिक, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, सहसंचालक कृषी आयुक्तालय पुणे, संचालक मृदसंधारण या पदावर आणि त्यानंतर फलोत्पादन संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान प्रसार, योजना, अर्थसाहाय्य, नैसर्गिक आपत्ती यामध्ये चांगल्या कामाचा अनुभव आहे.
पारधी समाजाला स्थिरसावर करण्याचे काम
"माझी निवड झाल्यानंतर मला पहिल्यांदाच बीडमध्ये कृषी विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण त्यावेळी बाबरी मशीद पाडली होती आणि त्यामुळे वातावरण ढवळले होते. या सगळ्या वातावरणात अनुसुचीत जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी शेततळे, ठिंबक सिंचन अशा अनेक योजना शासनाकडून राबवल्या जात होत्या. यावेळी फासे पारध्यांविरोधात पोलिसांनी मोठी माहीम आखली होती. हा समाज चोरीकडे जास्त वळला होता, त्यामुळे पोलिसांनी या समाजाला टार्गेट केलं होतं. यामुळे मी या समाजासाठी सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचं ठरवलं आणि जिल्ह्यातील पारधी समाजातील शेतकऱ्यांचा संयुक्तपणे सर्व्हे केला. त्यांच्यासोबत आम्ही एक मिटींग घेतली, ज्यामध्ये जिल्हाधिकारीही उपस्थित होते. त्यावेळी आम्ही या भटक्या शेतकऱ्यांना विहीर, पाईपलाईन, शेततळे, बियाणे देऊ शकतो असं सांगितलं. त्यांनीही होकार दिला आणि कामाला सुरूवात झाली."
पुढे या शेतकऱ्यांनी विहीर खोदण्यासाठी योगदानही दिलं, त्यातील ७० टक्के विहिरींना चांगलं पाणी लागलं. त्यामधून या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली आणि विक्रीतून होणाऱ्या पैशांवर उदर्निर्वाह सुरू केला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी मोते यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. एकंदरित फासे पारधी आणि भटका समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजाला स्थिरस्थावर करण्याचं मोठं स्थित्यंतर मोते यांच्या प्रयत्नामुळे घडवून आलं ही मोठी बाब आहे."
तरूण आणि शेतीशेतीतील नव्या प्रयोगामध्ये तरूणांचा मोठा प्रयत्न आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, नवे प्रयोग तरूणांकडून केले जातात. सध्या शेतीमध्ये जी काही प्रगती झाली आहे ती तरूणांमुळेच झाली आहे. दरम्यान, सध्या काही योजना आणि तंत्रज्ञान असं आहे की, जे अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही. सरकारी योजना शेतकऱ्यांकपर्यंत पोहचतात पण शासन ५० टक्के अनुदान देत असल्यामुळे उर्वरित ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांकडे नसते त्यामुळे अनेक शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहात आहेत असं मोते सांगतात.