- दत्ता लवांडे
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार संयुक्तपणे काम करत असते. त्याचबरोबर अनेक शास्त्रज्ञ, संशोधक, अधिकारी शेतकऱ्यांसाठी काम करत असतात पण ही लोकं आपल्या समोर येत नाहीत. लोकमत अॅग्रोच्या माध्यमातून अशा कृषीदूतांचा प्रवास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याद्वारे, त्यांचा प्रवास, शेती क्षेत्रातील योगदान, या क्षेत्रांत काम करताना असलेले ध्येय आणि कामात आलेले काही अनुभव जाणून घेत असतो.
शेतकरी आणि त्यासोबतच व्यवसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून असलेले राज्याचे सध्याचे पणन संचालक म्हणून कार्यरत असेले केदारी जाधव यांचाही प्रवास राज्याच्या विविध प्रशासकीय पदावरून झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी दूध, साखर, आणि त्यानंतर आता पणन या विभागामध्ये काम केले आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये त्यांनी उपनिबंधक म्हणूनही काम पाहिले.
दरम्यान, जाधव यांनी राज्याचे उपनिबंधक (अर्थ) या पदावर काम, त्यानंतर कोल्हापूर , पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये जिल्हा उपनिबंधक म्हणून काम, विभागीय सहनिबंधक (दुग्ध), पुणे जिल्ह्यासाठी सहनिबंधक, साखर आयुक्तालयात विभागीय सहसंचालक, सिडको उपनिबंधक आणि त्यानंतर पणन संचालक म्हणून केदारी जाधव यांची नियुक्ती झाली.
"कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपनिबंधक म्हणून काम करत असताना मला खूप अनुभव मिळाला. सहकाराचं माहेरघर म्हणजे कोल्हापूर होय. सहकारातली खरी ताकद मला कोल्हापुरात काम करत असताना कळाली. महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न कोल्हापूर जिल्ह्याचं सर्वांत जास्त आहे. कारण येथे सहकारी सूतगिरण्या, विणकर, साखर कारखाने, यंत्रमाग सोसायटी, प्रक्रिया संस्था, खरेदी विक्री संघ अशा अनेक संस्था कोल्हापुरात होत्या. त्यांची वार्षिक उलाढाल ही कोट्यांवधीमध्ये होती. मला कोल्हापुरात सहकाराचं बाळकडू मिळालं त्यावरच मी सध्या काम करतोय. पुणे, साताऱ्यातसुद्धा मला बराच अनुभव मिळाला. या कामाच्या माध्यमातून मला समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी साकारात्मक काय देता येईल हा माझा प्रयत्न असतो. मी जिथे काम केले आहे तिथे मी एकही तक्रार येऊ नये यासाठी काम केलं ही माझी सर्वांत मोठी उपलब्धी आहे. पणन विभागात जास्तीत जास्त शेतकरी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय किंवा आदेश देण्याचा प्रयत्न आमचा असतो." असं जाधव म्हणतात.
शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीत यायला पाहिजे
स्पर्धा परिक्षा किंवा नोकरीकडे शेतकऱ्यांच्या मुलांचा कल आहे पण वस्तुस्थिती पाहणे गरजेचे आहे. आपल्याकडे शासकीय नोकऱ्यांची संख्या आणि नोकरीसाठी इच्छुक लोकांची तुलना केली तर खूपच मोठा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीत येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केला तर नक्कीच शेतीत कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.
शेती साक्षरता महत्त्वाचीशेतकऱ्यांची साक्षर असण्याची गरज आहे. आपल्या पिकावर कोणती फवारणी केली पाहिजे आणि कोणते खत टाकले पाहिजे हे शेतकऱ्यांना माहिती नसते. तर कृषी सेवा केंद्राकडून जे खते किंवा औषधी दिले जातात त्यामुळे अवाजवी खर्च वाढतो आणि शेती तोट्यात जाते.
शेतकऱ्यांना सल्लाआपण आत्महत्या केल्यानंतर कोणतेही प्रश्न सुटत नसतात तर उलट हे प्रश्न वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाहीत. यश मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन संभावना निर्माण केली पाहिजे, त्यामुळे नव्या दिशा मिळतात. शेतकऱ्यांनी लढण्याची वृ्त्ती अंगी बाळगली पाहिजे.
शेतीचे भविष्यआपली लोकसंख्या आणि या लोकसंख्येला लागणारे अन्नधान्य हे शेतीतच उगणार आहे. त्यामुळे शेतीला कायम उज्ज्वल भविष्य असणार आहे. आधुनिकीकरण आणि डिजीटलायझेशनमुळे शेतकऱ्यांना अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.