पुणे : एक महिला सरपंच गावातील अवैधपणे सुरू असलेल्या दारूभट्ट्या बंद करण्यासाठी मोहीम हाती घेते आणि थेट दारूभट्ट्या पेटवून देत गावातील अवैध धंद्याला चाप लावते. त्यानंतर गावाला शिस्त लागते आणि सरपंचाचं नाव पंचक्रोशीत गाजतं. हे काम केलं आहे खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील विद्या मोहिते या महिला सरपंचाने. त्यांनी केलेल्या धाडसामुळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गावात झालेल्या आरोग्याच्या कामामुळे त्यांना लोकमत आणि बीकेटी टायर्स प्रस्तुत 'लोकमत सरपंच अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले आहे.
शेलपिंपळगाव हद्दीत सुरू असलेली अवैध गावठी दारूभट्टी केंद्र बंद करण्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये सरपंच विद्या मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध गावठी दारूभट्टी केंद्र पेटवून देत दारू बनविण्याचे कच्ची साधने नष्ट केली. त्यामुळे गावात दारूबंदी झाली असून यामुळे त्यांचा अवैध धंदे करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला आहे. त्याचबरोबर त्यांनी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी गावात दररोज सकाळी घंटागाडी सुरू केली.
त्याचबरोबर शेलपिंपळगाव येथील आरोग्य केंद्र हे पुणे जिल्ह्यातील सर्वोत्तम आरोग्य केंद्र ठरलेले आहे. यामध्येही वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांना आवश्यक ती मदत सरपंच विद्या मोहिते यांनी केली. त्यांचे कार्य उल्लेखनीय असून या कार्याचा गौरव लोकमत माध्यम समुहाने लोकमत सरपंच अवॉर्ड देऊन केला आहे.
या पुरस्काराचे वितरण पुण्यातील यशदा येथे झाले असून यावेळी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे, वनराईचे रविंद्र धारिया, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते भीम रासकर हे उपस्थित होते.