Join us

Lokmat Sarpanch Awards : लोकमतचे 'सरपंच ऑफ द ईअर' म्हणून 'यांना' मिळाला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:45 PM

लोकमतने पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या सरपंचांना सन्मानित केले आहे.

लोकमत आणि बीकेटी टायर प्रस्तुत 'लोकमत सरपंच अवॉर्ड्स'चे आज पुण्यात वितरण करण्यात आले.  या अवॉर्डसाठी पुणे जिल्ह्यातील १ हजार ३८५ सरपंचांचे अर्ज आले होते. त्यामधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३ सरपंचांची निवड करण्यात आली असून आंबेगाव तालुक्यातील धामणी गावचे सरपंच सागर जाधव यांना 'लोकमत सरपंच ऑफ द ईअर' म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी येथे हा कार्यक्रम पार पडला.

सरपंच सागर जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. त्यांच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही धामणीकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले १० वर्षे गावातील तरुणांना एकत्र करुन दिवाळीमध्ये लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करताना त्या प्रत्येक स्पर्धकाला दरवर्षी एका किल्ल्यावर सफरीसाठी नेले जाते. दरवर्षी शिवजयंतीला शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथून शिवज्योत आणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

जाधव हे लोकनियुक्त सरपंच पदी २०१७ ला विराजमान झाले. गावात काम करत असताना महिला अबालवृद्ध ज्येष्ठ सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. विशेषतः महिलांसाठी महाराष्ट्रामधील प्रथम चार चाकी ड्रायव्हिंगचा कोर्स धामणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेतला. शिवण क्लास, ब्यूटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, मायक्रो डिझाईनिंग हे कोर्स घेतले. त्याचप्रमाणे संपूर्ण तालुका व जिल्ह्यामध्ये चर्चा झालेला महिला अभ्यास दौरा यामध्ये तब्बल ३०० महिलांनी सहभाग घेतला. महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुढाकार घेतला.

कोरोना काळातसुद्धा कोरोना झाल्यावर रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखल करणे, लसीकरण करणे, फवारणी, कोरोना तपासणी कॅम्प वेळोवेळी आयोजित करून कोरोना हद्दपार करण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे जे मृत झाले आहे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करताना स्वतः पीपीटी किट घालून काम केलं. याची दखल महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी घेतली आणि पुणे, सातारा सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यामधून धामणी गावची निवड करून कोरोनाची यशोगाथा ही मुख्यमंत्र्यांसोबत मांडण्याची संधी मिळाली.

त्याचप्रमाणे २०१८ साली दुष्काळ पडला असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे आंबेगाव तालुक्यातून सरपंच म्हणून त्यांना बोलण्याची संधी मिळाली दुष्काळी गावच्या व्यथा मांडताना गावासाठी तब्बल सात हापसे एकाच दिवशी मंजूर झाले.

सामाजिक काम करत असताना पाणी काढायला त्रास होत असताना फळी काढायला आडात उतरणे, विहिरीची साफसफाई, स्मशानभूमीची साफसफाई, गावातील गटाराची सफाई असे अनेक बारीक काम करत असताना कुठल्याही गोष्टीची लाज न बाळगता त्यांनी काम केले. गावात धुरळणी, तणनाशक फवारणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली. सर्व ग्रामस्थांना सर्व समावेशक काम करत कुठल्याही पक्षाचा भेदभाव केला नाही. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला विचारात घेऊन काम केले.

त्यांच्या या समाजोपयोगी कामामुळे त्यांचा लोकमतच्या माध्यमातून 'लोकमत सरपंच ऑफ द ईअर' या पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी