Join us

सत्तरीतल्या शेतकरी आजीची किमया, वीस गुंठ्यात सहा पिके घेत दररोज कमावतेय..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 11:35 AM

अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील ७० वर्षे वय असलेल्या पंचफुलाबाई डोईफोडे या आजीने वीस गुंठ्यात सहा पिके घेण्याची किमया करून दाखविली आहे.

युनूस नदाफ

पंचफुलाबाई डोईफोडे यांनी वीस गुंठ्यात पपई पिकाची लागवड केली आहे. त्यात अंतर्गत पीक म्हणून काकडी, दोडके, मिरची, टोमॅटो, वांगे आदी पिकांची लागवड केली आहे. या सर्व पिकातून त्यांना दररोज १२०० ते १५०० रुपये उत्पन्न मिळत आहे. पंचफुलाबाई स्वतः पिकांची काळजी घेतात, स्वतः पिकांना पाणी देणे, औषध देणे, निंदणी करणे ही सर्व कामे त्या स्वतः करतात. या कामात त्यांचा मुलगा विठ्ठल डोईफोडे हे मदत करतात.

विठ्ठल डोईफोडे हे सुतार कामाचा व्यवसाय करत शेताच्या कामात लागणारे बियाणे, खते आणून देतात. भाजीपाला पिके घेऊन स्वतः बाजारात विक्री करण्यासाठी त्या नेतात. तसेच पार्डी गावात घरोघरी भाजीपाल विकतात. पार्डी येथील गृहिणींना ताजा भाजीपाला मिळत असल्याने पंचफलाबार्ड डोईफोडे यांच्याकडून भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होते. दररोज शेतामधून भाजीपाला आणून विकल्याने त्यांना १२०० ते १५०० रुपये नगदी उत्पन्न मिळत आहे.एका पिकावर अवलंबून न राहता अंतर्गत पिके घेऊन भरघोस उत्पन्न काढता येते. तसेच स्वतः मेहनत केल्यावर उत्पन्न मिळतेच तसेच अन्य खर्च वाचतो, असे पंचफुलाबाई यांनी सांगितले.

कमी जमीन, जास्त उत्पन्न

पंचफुलाबाई या दिवसरात्र शेतामध्ये काम करतात. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी सुद्धा त्या जातात. या वयात जिद्द व चिकाटी तरुण शेतकऱ्यांना ऊर्जा देणारी आहे. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. मेहनतीने कमावले तर त्यामध्ये समाधान मिळते. कमी जमिनीत जास्त उत्पन्न काढण्याची किमया या आजीने करून दाखविली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रनांदेडफलोत्पादन