बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : वांगदरी येथील पदवीधर युवक चेतन संतोष नागवडे याने शिक्षक होण्याचा नाद सोडून दिला आणि शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला उन्हाळ्यात खरबुज कलिंगड या झटपट येणाऱ्या पिकांकडे फोकस केला यंदा खरबुज फळांना चांगला भाव मिळाला अवघ्या ७० दिवसात दोन एकरात ७ लाख ७० हजाराची लाॅटरी खरबुज पिकातून लागली आहे.
चेतन नागवडे याने श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून एम ए केले आणि घारगाव येथील साईकृपा महाविद्यालयात बी एड साठी प्रवेश घेतला. शिक्षक होऊन दरमहा ठराविक पगार घेण्यापेक्षा वडिलोपार्जित सात एकर शेतीत पिक पॅटर्न बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने नियोजन केले.
काष्टी येथील कृषी तज्ञ भाऊ शेलार व शहाजी फराटे यांना गुरु मानले आणि उन्हाळा कलिंगड खरबुज ही पिक घेण्यावर भर दिला कोरोना काळापासून दरवर्षी सात एकर पैकी ५० टक्के क्षेत्रावर कलिंगड खरबूज पिक घेण्याचा मास्टर प्लॅन तयार केला या शेतीने चेतन नागवडे यांची आर्थीक घडी बसविली.
या वर्षी कांदा पिक घेतले कांदा काढुन त्या शेतात खरबुजाची दोन एकर क्षेत्रामध्ये ७० दिवसात ३८ मे टन उत्पादन काढले आणि २२ ते २६ रू किलो प्रमाणे खरबुजाला भाव मिळाला दोन एकरात ७ लाख ७० हजार एवढे उत्पन्न मिळाले यातून चेतन नागवडे यांच्या नियोजन व कष्टाचे चिज झाले.
नोकरी पेक्षा शेती भारी नोकरी लागली तर काही वर्षे कमी पगारावर काम करावे लागते शेतीत चांगले कष्ट नियोजन केले तर निश्चितच आर्थिक फायदा होतो.याचा अनुभव मित्राकडून घेतला. आणि पदवीधर असुन शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला यश आले. ही समाधानाची बाब आहे. - चेतन नागवडे, शेतकरी वांगदरी
अधिक वाचा: बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी