संतोष सारडा
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील भगवान अवघड यांनी डाळींब शेतीतून भरघोस उत्पन्न मिळविण्याची किमया साधली आहे. २०१२ च्या दुष्काळात पाण्याअभावी त्यांच्या शेतातील मोसंबीची ११०० झाडांची बाग जळून नष्ट झाली. अशास्थितीत हार न मारता या शेतकरी दाम्पत्याने सहा एकरात डाळींबाची बाग फुलवली. विशेषतः उत्पादित माल सलग तीन वर्षे युरोपाच्या बाजारपेठेत विक्री करून नफाही मिळवला आहे.
जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाकुळणी गावातील युवा शेतकरी भगवान सुखदेव अवघड यांचे एम. ए. मराठी शिक्षण झाले आहे. परंतु, नोकरीच्या मागे न लागता आपल्या शेतीतून समृद्धीचा मार्ग त्यांनी निवडला. त्यांच्या शेतात वडिलोपार्जित ११०० झाडांची मोसंबीची फळबाग होती.
परंतु, सन २०१२ मध्ये पडलेल्या दुष्काळात मोसंबीची बाग पाण्याअभावी नष्ट झाली. या स्थितीत हताश न होता या शेतकऱ्याने कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारी फळबाग लागवड करण्याचा विचार केला. त्याकरिता त्यांनी ठिकठिकाणी बागांची पाहणी करून डाळींबाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सहा एकरात ११०० डाळींबाच्या झाडांची लागवड केली. केवळ ११०० डाळिंबांच्या झाडांमधून ५० ते ५५ टन डाळींबांचे उत्पादन घेऊन सुमारे ५१ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊस उत्पादनाचा ब्रॅंड
तीन वर्षे डाळिंबाची विदेशात निर्यात
भगवान अवघड यांनी तीन वर्ष डाळींब परदेशात निर्यात केले. या शेतकऱ्याने सन २०१७, २०१८ व २०१९ मध्ये आपल्या फळबागेत डाळींबाची निर्यात क्षमता राहावी, याकरिता सूक्ष्म नियोजन करून उच्च दर्जाच्या डाळींबांचे उत्पादन घेतले.
त्यामुळे त्यांना या तिन्ही वर्षांत डाळींबाची युरोपीय देशात निर्यात करता आली.
फळबागेसाठी पती - पत्नी दोघांचे नियोजन
ही फळबाग जोपासण्यासाठी भगवान अवघड स्वतः ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी व इतर शेतीच्या मशागतीचे काम करतात. त्यांची पत्नी रंजना या सुद्धा फळबागेतील विविध प्रकारची कामे स्वतः करतात. काही कामे महिला मजुरांकडून करून घेतली जातात. त्यांचा मुलगाही या कामी हातभार लावतो. कोरोना काळात मजूर कामाला येत नव्हते. तेव्हा त्यांनी घरीच या फळबागेचे नियोजन व कामकाज यशस्वीपणे केले.
दुष्काळामुळे पाणी नियोजनाचा धडा
सन २०१२ च्या सुमारास पडलेल्या दुष्काळामध्ये पाण्याअभावी मोसंबीची संपूर्ण बाग नष्ट झाली होती. या दुष्काळातून पाणी नियोजनाचा धडा घेतला. कमी पाण्यात येणाऱ्या डाळींबाची लागवड केली. वर्षातून एकदाच मृग बहार घेतला जातो. यापूर्वी आपल्याकडे डाळींबांना कमी भाव असल्यामुळे डाळींब निर्यात केली. परंतु, आता आपल्या बाजारपेठेत डाळींबाला १०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्यामुळे सध्या डाळींबाची निर्यात करत नाही. - भगवान अवघड, शेतकरी