चांगला दर मिळत असल्याने मका पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. औद्योगिक वापर, पशुखाद्य वापर, मानवी खाद्य वस्तू तयार करण्यासाठी आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वाढता वापर पाहता गरज वाढवत आहे. त्यात भारताने मका निर्यातीसाठी चांगले पोषक वातावरण दिल्याने मक्याची निर्यात पाच पटीने वाढली आहे.
मका हे खरेतर पाच महिन्यांत तयार होणारे पीक आहे. परंतु, शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा वापर करून पीक घेतले तर एकरी लाखभर रुपये पाच महिन्यांत मिळवून देणारे हे पीक आहे. एकरात ६० क्विंटल मका उत्पादन हे जत, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यातून साध्य करुन दाखवले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणधूळगावच्या रमेश खंडागळे यांनी राज्यपातळीवर मका उत्पादनाचा उच्चांक निर्माण करुन दाखविला, मका पेरणी करताना दोन ओळींत दोन फुट (६० सें.मी.) व दोन रोपात ८ इंच (२० सें.मी.) अंतर ठेवून दुचाडीने पेरणी केली तर एकरी ३३ हजार रोपे मिळतात.
एका मक्याच्या ताटाला एक कणीस मिळते. त्या कणसातून २०० ग्रॅम दाणे मिळाले तर ६६ क्विंटल उत्पादन एकरी मिळते. म्हणून सुरुवातीला पातळ वाटले तरी पेरणीचे अंतर दोन फुट बाय ८ इंच ठेवावे.
बी पेरणीपूर्वी फोरटेन्झा ड्यूयो हे कीटकनाशक सहा मि.ली. प्रति किलो बियाणास चोळावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक व अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धन २५ ग्रॅम १ किलो बियाणास पेरणीपूर्वी दोन तास अगोदर लावावे. एक एकर मका पेरणीसाठी ८ किलो बियाणे वापरावे.
एकरी ६० क्विंटल उत्पादनासाठी खताचा वापर फार महत्त्वाचा आहे. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी एकरी ४ टन (१० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळण्याची गरज आहे.
पेरणीच्या वेळी बी पेरताना १०:२६:२६ हे खत एकरी १०८ किलो व झिंक सल्फेट १० किलो प्रति एकर वापरावे. त्यानंतर पीक चारपाणांवर असताना एकरी ३३ किलो युरिया व आठपाणांवर असताना एकरी ४० किलो युरिया वापरावा. त्यानंतर तुरे अवस्थेत नॅनो युरिया १०० मि.ली. फवारणी करावी.
मका पिकात तण नियंत्रणासाठी अँट्राटॉप ५० टक्के, एकरी एक किलो पेरणी झाल्याबरोबर २०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे, फवारणी करत पाठीमागे जावे, फवारणीची फिल्म तुद्ध देऊ नये.
मका पिकावर येणाऱ्या कीड नियंत्रणासाठी वरीलप्रमाणे बीज प्रक्रिया केल्यास २५ दिवस किडीपासून संरक्षण मिळते. २५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी. ४५ दिवसांनी इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एस.जी. ८० ग्रॅम प्रति एकर शेतकऱ्यांनी फवारण्याची गरज आहे.
मका पिकाचे उत्पादन फायदेशीर■ येत्या पाच वर्षांमध्ये सरकारकडून मका उत्पादनात १० दशलक्ष टनांपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट■ मका हे पीक इथेनॉल निर्मितीसाठी महत्त्वाचे पीक■ मका उत्पादनाद्वारे "फार्म टू प्युल" नावाची महत्वाकांक्षी योजना राबविली■ जाणार २०२२-२३ देशात ३५.९१ लाख टन उत्पादन नोंदवले गेले आहे. २०२३-२४■ मध्ये देशातील मका उत्पादन ३२.४७ लाख टन इतके नोंदवले. मका उत्पादक शेतकरी अन्नदाता नाही ऊर्जादाता ठरणार■ भारत बनतोय मका निर्यातीचे केंद्र. पाच वर्षांत निर्यातीत पाच पटीने वाढ मेट्रिक टन वार्षिक मका निर्यात■ भारत जगभरात ३४ लाख ५३ हजार ६८० २०२२-२३ मध्ये जवळपास ८,९८७ कोटींचे परकीय चलन भारताला मका निर्यातीत मिळाले■ एकूण लागवडीच्या क्षेत्रासाठी भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. मका उत्पादनात भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे.
मनोजकुमार वेताळ कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली
अधिक वाचा: Soybean Variety: हे आहेत सोयाबीनचे टॉप १० फेमस वाण, तुम्ही कुठले पेरणार?