कमी पाण्यात हमखास येणारे पिक म्हणून ओळख असलेला शेवगा आता दुष्काळी भागासाठी वरदान ठरू लागला आहे. मालेगाव तालुक्याच्या माळमाथ्यासह कळवण, सटाणा, देवळा तालुक्यात दरवर्षी या पिकाच्या लागवडी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढच होत आहे. या परिसरातील शेवगा आता थेट बांगलादेशसह भूतान या देशातही निर्यात होवू लागल्याने उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
अशी होती अंधश्रद्धा
तालुक्यातील चिचावड येथे २००९ साली प्रायोगिक तत्वावर एका शेतकऱ्याने शेवग्याची लागवड केली. कारण पूर्वी अंधश्रद्धेमुळे शेवगा कोणी लावत नव्हते. दारात शेवगा असला तरी वावगे समजले जायचे. परंतु याच शेतकऱ्याचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. शेवग्याला त्यावर्षी १२५ ते १५५ रूपये किलो प्रमाणे दर मिळाला. विशेष म्हणजे तो बाहेरच्या राज्यातही जाऊ लागला. त्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये शेवग्याची चांगलीच क्रेझ निर्माण झाली.
२०१४-१५ पासून शेतकऱ्यांनी शेवग्याकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहू लागले. हळूहळू शेवग्याच्या क्षेत्रात वाढ झाली. २०१५-१७ मध्ये मालेगाव मार्केटमध्ये शेवगा येऊ लागला. हा माल घ्यायला वाशीचे व्यापारी येतात. २०१८ पासून मालेगाव तालुक्यात शेवग्याचे लागवड क्षेत्र वाढले. हा माल घ्यायला उत्तर प्रदेश, बिहार, दक्षिण भारतातून व्यापारी येऊ लागले.
सिझनमध्ये दररोज ७० ते ८० टन माल
शेवगा सिझनमध्ये दररोज ७० ते ८० टन इतका विक्रीस येतो. बाहेरील राज्यातील व्यापारी सुमारे १५० टन माल खरेदी करतात. यात साउथचे व्यापारी मोठ्या प्रमाणात असतात. या मालाला परराज्यात अधिक मागणी आहे. सध्या शेवग्याला ४० ते ४५ रूपये किलो भाव मिळत आहे.
पाऊस नसल्याने वाढला सिझन
शेवग्याचा दिवाळी ते मे महिन्यापर्यंत साधारण सिझन असतो. परंतु यंदा पाऊस लांबल्याने अजून १५ दिवस तरी शेवगा मार्केटमध्ये उपलब्ध राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेवग्याला वर्षात दोनदा फळ येते. एकदा झाड कटिंग झाल्यानंतर पुन्हा नवीन माल येतो व तो दोन महिने चालतो.
मध्यम शेवग्याला डिमांड
व्यापारी शेवगा घेतांना किंवा निर्यात करतांना खूप चोखंदळपणे निवड करतात. यात शेवग्याची लांबी, जाडी, रंग पाहिले जाते. २२ ते २८ इंचीपर्यंत शेवग्याची उंची असते. आपल्याकडील ग्राहक अथवा व्यापारी मध्यम प्रकारच्या शेंगांना पसंती देतात तर इशान्य भारतात मात्र अत्यंत कमी बारिक असलेली शेंगीलाच नागरिक पसंती देतात.
कॅल्शियम कंपन्यांमध्ये मागणी
गुणकारी शेवगा शेतकऱ्यांबरोबर कॅल्शियमच्या कंपन्यांच्या पसंतीला उतरू लागला आहे. डाळिंब व इतर फळ पिकांपेक्षा अधिक पैसे मिळत असल्याने शेवग्याचे क्षेत्र हळूहळू वाढले. शेवग्याच्या शेंगेपासून तसेच पाल्यापासून पावडर करत तिचा कॅल्शियम म्हणून चांगला वापर केला जातो. त्यामुळे केमिकल कंपन्यांकडूनही शेवग्याला चांगली मागणी आहे.
शेवगा पिक हे शेतकऱ्यांच्या हक्काचे पिक झाले आहे. अत्यंत कमी पाण्यात हमखास हे पिक येते. माळमाथ्यावर चांगली लागवड केली जाते. ग्राहकांबरोबरच बाहेरही इतर देशांमध्ये, राज्यांमध्ये मालेगावच्या शेवग्याला चांगली मागणी आहे.
-यशवंत खैरनार, व्यापारी, मालेगाव
शेवग्यासाठी फक्त मालेगावलाच मार्केट
शेवग्याचा लिलाव होणारे मार्केट फक्त मालेगावलाच आहे. त्यामुळे अनेक शेतकरी, व्यापारी येथेच येतता. जळगाव, चोपडा, नेर, कुसुंबा, साक्री, नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातून येथे शेतकरी माल आणतात.
आयुर्वेदात शेवग्याला महत्त्व आहे. उष्ण गुणधर्म असलेला शेवगा कफ व वात कमी करतो. शरीरातील उष्णता वाढवतो. कफाच्या आजारावर गुणकारी आहे. शेवग्याच्या पानांची वाफ विविध आजारांवर दिली जाते.
-डॉ. शशिकांत कापडणीस, आयुर्वेद चिकित्सक, सटाणा