मुरुड परिसरातील गुंफवाडी येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात १२ गुंठे क्षेत्रात ड्रॅगनफ्रूटमध्ये आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरीचा मळा फुलविला आहे. मूळ विदेशातील असलेले स्ट्रॉबेरीचे पीक महाबळेश्वर याठिकाणी घेण्यास सुरुवात झाली. तेथे या पिकास हवामान पोषक असल्याने तेथेच याचे उत्पादन मिळते, असा सर्वांना समज होता. मात्र, ग्रामीण भागातील गुंफवाडीसारख्या ठिकाणी स्ट्रॉबेरीचे पीक घेता येते, हे शेतकरी महेश लांडगे यांनी सिद्ध केले.
गुंफवाडी येथील महेश लांडगे यांना वडिलोपार्जित १० एकर जमीन आहे. यामध्ये ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, सफरचंद, सीताफळ अशी पिके ते सातत्याने घेत असतात. पदवीचे शिक्षण घेऊन शेती करायची की, नोकरीसाठी प्रयत्न करायचे या विचारात असताना त्यांनी घरची शेती करण्याचा निर्णय घेतला व प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. शेती करणे सोपी बाब नाही हे त्यांना लक्षात आले, त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता, सोयी सुविधा व बाजारपेठ कशी आहे याचा त्यांनी अभ्यास केला.
हेही वाचा-बीडच्या मातीत सफरचंद लागवड! मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग
शेती परवडणारी कशी होईल, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. त्यामुळे १२ गुंठे क्षेत्रात त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून, पहिल्या टप्प्यात एक लाखाचे उत्पादन मिळाले आहे. शेतीत काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी त्यांनी स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा निर्णय घेतला व हा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून, शेती पाहण्यासाठी शेतकरी भेट देत आहेत.
हेही वाचा- 75 हेक्टरवर डाळींब उत्पादन, चारशे जणांना रोजगार, मालेगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा
ड्रॅगनफ्रूटमध्ये स्ट्रॉबेरीचे आंतरपीक...
• २०१३ साली लातूरमध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड त्यांनी केली होती, ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड केल्याने त्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यानंतर स्ट्रॉबेरीची लागवड सप्टेंबर २०२३ मध्ये केली. आजपर्यंत एक लाखाचे उत्पन्न त्यांना प्राप्त झाले आहे. अशाच पद्धतीने निसर्गाची साथ व प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलो तर भविष्यात आणखीन चार लाख रुपये उत्पन्न त्यांना स्ट्रॉबेरीमधून अपेक्षित असल्याचे महेश लांडगे यांनी सांगितले. स्ट्रॉबेरी लातूर, पुणे, सोलापूर येथे विकण्यासाठी देत असतात, त्यामुळे अपेक्षित उत्पन्न त्यांना मिळत आहे.