रविंद्र जाधव (शिऊरकर)
अधिक उत्पादन सोबत चोख व्यवस्थापन आणि वेळोवेळी तज्ञांचं मार्गदर्शन या सर्वांच्या मदतीने मिठ्ठू एकनाथ चव्हाण हे गेल्या ३० वर्षांपासून शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील भांडेगाव येथील चव्हाण यांना एकूण ७.५ एकर जमीन.
अल्प पाण्याचा मात्र उत्तम जमिनीचा हा भाग. कापूस, तूर, बाजारी, ज्वारी, आदी पारंपरिक पिकांच्या या पट्ट्यात २५ वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या फळबाग लागवड उपक्रमातून चव्हाण यांनी केशर आंब्यांची एका हेक्टरवर ३० फुट बाय २५ फुट अंतरावर लागवड केली.
वेळोवेळी माती परीक्षण करत शेताला हवे असलेले सेंद्रिय घटकांचे खत देत चव्हाण यांनी फळबागेचे व्यवथापन केले. माती परीक्षणातून खतांवर होणारा खर्च कमी होत मातीचा पोत सुधारल्याचे ते आवर्जून सांगतात.
सेंद्रिय शेती सोबत हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर करत चारा निर्मिती आदीत मिठ्ठू चव्हाण हे अग्रगण्य आहे. चव्हाण यांनी २००९ साली मका पिकाचे एकरी ४० क्विंटल उत्पादन घेतले होते, ज्याकरिता त्यावेळेस विविध स्तरांवर त्यांचा सत्कार झाला होता. तसेच कपाशी उत्पादनात देखील त्यांचा हातखंडा आहे.
उष्णतेच्या झळात तसेच गत काही दुष्काळी वर्षांत चव्हाण यांच्या बागेतील जवळपास ३० झाडे कमी झाली आहे. तर गावरान आणि राजापुरी आंब्याची काही झाडे देखील त्यांनी काही ठिकाणी लावलेली आहे.
देशी गोवंशांचे संगोपन
मिठ्ठू चव्हाण हे देशी तीन गाई व दोन बैलांचे संगोपन करतात. या जनावरांच्या संगोपणातून शेतीला पुरेसे शेणखत मिळत असल्याचे चव्हाण सांगतात. तसेच गाईंच्या दुधाद्वारे घरची दुधाची गरज भासत असल्याचे ही ते सांगतात. विशेष की शेतात सर्वाधिक वापर शेणखताचा चव्हाण करतात.
फळबागेने दिले जीवनाला दिशा
मिठ्ठू चव्हाण सांगतात की, गत २० वर्षांपासून आंबा फळबागेतून उत्पन्न सुरू असून याद्वारे पूर्ण शेतीला पुरेसे ठिबक घेता आले, मुलांचे शिक्षण पूर्ण केले, वेळोवेळी कौटुंबिक गरजा पूर्ण झाल्या. तसेच यंदा ही सध्या असलेल्या ७० झाडांच्या या बागेने जवळपास २ लाखांचे उत्पन्न दिले आहे. उष्णता अधिक असल्याने काहीअंशी फटका बसला मात्र तरीही इतर पिकांच्या तुलनेत हे उत्पन्न आमच्यासाठी चांगले आहे.