Lokmat Agro >लै भारी > कडक पांढऱ्या टोपीवाला मराठी निर्यातदार! तब्बल १० देशांत मक्याच्या पदार्थांची करतोय निर्यात

कडक पांढऱ्या टोपीवाला मराठी निर्यातदार! तब्बल १० देशांत मक्याच्या पदार्थांची करतोय निर्यात

Marathi exporter rahul mhaske with a hard white cap Maize products are being exported to as many as 10 countries | कडक पांढऱ्या टोपीवाला मराठी निर्यातदार! तब्बल १० देशांत मक्याच्या पदार्थांची करतोय निर्यात

कडक पांढऱ्या टोपीवाला मराठी निर्यातदार! तब्बल १० देशांत मक्याच्या पदार्थांची करतोय निर्यात

पुण्यातील वाघोली येथील रहिवासी असलेल्या राहुल म्हस्के यांनी मेकॅनिअल इंजिनिअर आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

पुण्यातील वाघोली येथील रहिवासी असलेल्या राहुल म्हस्के यांनी मेकॅनिअल इंजिनिअर आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- दत्ता लवांडे

पुणे : शेतमाल निर्यात करण्यासाठी भारतातील शेतकऱ्यांना खूप संधी आहेत. पण सर्वच शेतकरी शेतमाल निर्यातीत पुढे येत नाहीत. वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या अन् अन्नधान्यांवर प्रक्रिया करून निर्यात केल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो. पुण्यातील राहुल म्हस्के हे मागच्या तीस वर्षांपासून मक्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवून त्याची देशांतर्गत  बाजारपेठेत आणि परदेशात निर्यात करतात. 

पुण्यातील वाघोली येथील रहिवासी असलेल्या राहुल म्हस्के यांनी मेकॅनिअल इंजिनिअर आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. १९९२ साली इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या व्यवसायात पाऊल ठेवले. वाघोली येथे त्यांची वडिलोपार्जित शेती होती. सुरूवातील ते शेतीत स्ट्रॉबेरीचे पीक घेत होते. हे पीक जास्त खर्चिक असल्यामुळे त्यांनी नवीन पर्याय शोधायला सुरूवात केली. 

मुंबईला स्ट्रॉबेरी विकायला जात असताना राहुल यांना गोड मक्याचा पर्याय सापडला आणि मक्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. मक्याचे पीक घेण्यासाठी त्यांना त्यावेळी बियाणे आयात करावे लागले. पुढे त्यांनी लागवड केलेल्या मक्याचे उत्पन्न चांगले येऊ लागल्यानंतर बियाणे मुक्तपणे आयात करण्यासाठी केंद्र सरकारला गळ घातली. पुढे मुक्तपणे बियाणे आयात करण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आणि म्हस्के यांनी ऑस्ट्रेलिया, थायलंडवरून बियाणे आयात केले. 

दरम्यान, पुढे या गोड मक्याच्या विक्रीसाठी १९९९ साली पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर कॉर्न क्लब नावाचे दुकान सुरू केले. तिथे मक्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ ते विक्री करू लागले. शेतकऱ्यांसोबत मक्याची करार शेती करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर मक्यापासून बनवलेले पदार्थ विक्री करण्यासाठी परदेशी बाजारपेठांची निवड केली.

पुढे मान्सून अॅग्रो बायो प्रा. लि. कंपनीची स्थापना करून त्या माध्यमातून मक्याच्या पदार्थांची निर्यात सुरू केली.  यासाठी ते पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून आणि परराज्यांतूनही मका विकत घेऊन प्रक्रिया करतात. महाराष्ट्रात मक्याचे उत्पादन बाराही महिने होत असल्यामुळे येथील मक्यावरील प्रक्रिया वर्षभर सुरू असते. त्यांच्याकडे सध्या दररोज २० टन मालावर प्रक्रिया केली जात आहे.

प्रक्रिया करून हे पदार्थ तयार केले जातात
म्हस्के यांच्याकडे मक्यापासून बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न, मक्याचे गोठवलेले दाणे, कटलेट्स, चीज बॉल, समोसा ही प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केली जातात. तर यातील फ्रोझन बेबी कॉर्न आणि स्वीट कॉर्न किंवा इतर मालाच्या मागणीनुसार माल तयार करून निर्यात केली जाते. तर लोकल मार्केटमध्ये मॉल, रेस्टॉरंट, लग्नसमारंभ, कार्यक्रमासाठी या मालाची विक्री केली जाते.

या देशांत  होते निर्यात
म्हस्के यांनी माल विकण्यासाठी बाजारपेठ शोधली असून प्रक्रिया केलेला माल सध्या ते मलेशिया, रशिया, अमेरिका, आखाती देश, ओमान, दुबई, बांगलादेश या देशांमध्ये पाठवत आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, कोलंबिया अशा देशांमध्येसुद्धा त्यांच्या मालाला मागणी आहे.

कडक पांढरी टोपी बनली ओळख
त्यांनी काही दिवसांपूर्वी कडक पांढरी टोपी घालायला सुरूवात केल्यानंतर त्यांची ती ओळख निर्माण झाली. बाजारपेठेचा अभ्यास करण्यासाठी ते परदेशात जरी गेले तरी पांढरी टोपी घालूनच जातात. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून परदेशात प्रवास करताना अनेक लोकं त्यांच्या या स्टाईलचे कौतुक करतात. 'आपली मराठी संस्कृती आपण जपली पाहिजे, म्हणून तरूणांनीही टोपी घालायला पाहिजे' असं ते सांगतात.

स्थानिक महिलांना रोजगार निर्मिती
पुण्यातील हडपसर भागात असलेल्या रामटेकडी इंडस्ट्रियल एरियामध्ये त्यांचे प्रोसेसिंग युनिट असून  शेतकऱ्यांकडून मका फॅक्टरीमध्ये आल्यानंतर कणीस सोलावे लागतात. या कामासाठी तेथील स्थानिक महिलांना रोजगार दिला जातो. तर यांच्या कामात कायमस्वरूपी तत्त्वावर जवळपास ५० कर्मचारी काम करतात. त्यामध्ये महिलांचा प्रामुख्याने सामावेश केला आहे. 

निर्यातीतून आर्थिक उत्पन्न
मान्सून अॅग्रोमध्ये दररोज २० टन मक्यावर प्रक्रिया होते. ही प्रक्रिया दिवसभरातील दोन शिफ्टमध्ये चालते. शेतकऱ्यांनाही वेळेवर पेमेंट दिले जाते. मागच्या वर्षी त्यांनी या व्यवसायातून १२ कोटींची उलाढाल केली असून यावर्षी हीच उलाढाल १५ कोटींच्या घरात जाण्याची त्यांना अपेक्षा आहे. या व्यवसायामध्ये प्रत्येक महिन्याला १ ते दीड कोटींची उलाढाल केली जाते. 

शेतकऱ्यांना फायद्याचे पीक
महाराष्ट्रामध्ये मक्याची दररोज साधारणपणे १ हजार टनांची काढणी होते. त्यातील ९० टक्के मालावर प्रक्रिया होत असून बाकीचा माल लोकल मार्केटमध्ये विकला जातो. तर चांगल्या बियाणाची उपलब्धता, मार्केट, प्रक्रिया केलेल्या पदार्थांची निर्यात आणि जनावरांना चाऱ्यासाठी चांगला उपयोग यामुळे मधुमका म्हणजे गोड मक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची असल्याचं म्हस्के सांगतात. 

बियाणाची करावी लागते आयात
या गोड मक्याच्या बियाणाची अजूनही भारताला आयात करावी लागते. भारतामध्ये या बियाणांवर संशोधन केला जात नसल्यामुळे इथे हे बियाणे उपलब्ध नाही. तर थायलंडसारख्या देशामध्ये यावर संशोधन सुरू असून लाल, गुलाबी रंगाच्या गोड मक्याचे वाण विकसीत करण्यात आले आहेत. आपल्या देशात बियाण्यावर संशोधन झाले तर बियाणे शेतकऱ्यांनी स्वस्तामध्ये मिळेल अशी त्यांची आशा आहे. 

दरम्यान, शेतकऱ्यांना मक्याचे पीक फायद्याचे असून शेतकऱ्यांनी याकडे वळाले पाहिजे. तर मक्यावर प्रक्रिया करून निर्यात करायची असल्यास मार्केटचा अभ्यास असणे गरजेचे आहे. निर्यात आणि प्रक्रिया उद्योगांमध्ये शेतकऱ्यांना अनेक संधी उपलब्ध असल्याचं म्हस्के सांगतात. 

 

Web Title: Marathi exporter rahul mhaske with a hard white cap Maize products are being exported to as many as 10 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.