पनवेलच्या मातीत बासमती तांदूळ तसेच लॅटिन अमेरिकी ड्रॅगन फ्रूटचा यशस्वी प्रयोग महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त मीनेश गाडगीळ येथील शेतकऱ्याने करून दाखविला आहे. एकीकडे शेतकरी शेतीपासून दुरावले जात असताना गाडगीळ यांनी शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणा देत आहेत. आता त्यांच्या शेतात जपानी तांदळाची लावगड करण्यात आली आहे. त्यापासून चांगले उत्पन्न घेता येत असल्याचे ते सांगतात.
पनवेल येथील गुळसुंदेत साडेतीन गुंठे जागेत गाडगीळ अनेक पिके घेत आहेत. आता त्यांनी जपानी ब्लॅक राईसची लागवड केली आहे. हा ब्लॅक राईस फॉरबिडंट राइस म्हणून ओळखला जातो. ही जपानमधील तांदळाची व्हरायटी असून, जपानमधील फक्त राज घराण्यासाठी हा तांदूळ पिकविला जात होता. यामध्ये अन्थोनीन हे नैसर्गिक पिग्मेंट आहे, ज्यामुळे याला ब्लॅक कलर प्राप्त होतो व उकडल्यानंतर याला डार्क परपल कलर (जांभळा) येतो. उकडण्याआधी चोवीस तास तांदूळ भिजत ठेवून नंतर तो उकडला जातो. या तांदळात अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने याला विशेष मागणी आहे. त्याच बरोबर या तांदळात आर्यन, व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
आरोग्यासाठी हितकारक तांदूळ- या तांदळात फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळेच १ वेटलॉस्टसाठी हा तांदुळ उपयोगी पडतो. या तांदळात मधुमेह व कोलेस्टेरॉल कमी करण्याचे गुणधर्म आढळतात. त्याचप्रमाणे या तांदळात अॅन्टीकॅन्सर गुणधर्म असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.- विशेष करून डेझर्ट, केक, ब्रेड, नूडल्स यासाठी हा तांदूळ वापरला जातो. इंडोनेशिया, चायना, म्यानमार तसेच भारतातील नार्थ इस्ट भागात हा तांदूळ पिकविला जातो. असा बहुगुणी तांदूळ मीनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतात पिकविला आहे.
ब्लॅक राइस हा जपानी तांदूळ आहे. त्याचे उत्पादन मी माझ्या शेतात पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतले आहे. साधारण १२० ते १३० दिवसांत हा तांदूळ तयार केला जातो. शेतकऱ्यांनी पारंपरिक तांदळाच्या वाणाबरोबर नावीन्यपूर्ण वाण लावल्यास त्याला चांगला भाव मिळेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. - मीनेश गाडगीळ, कृषिभूषण शेतकरी
अरुणकुमार मेहत्रे