मेहरून नाकाडेचिपळूण तालुक्यातील मिरवणे येथील मेघना गुढेकर गावातील अकरा बचत गटांच्या प्रमुख म्हणून काम करीत आहेत. प्रत्येक बचत गटाचा व्यवसाय सुरू केला आहे. इतकेच नव्हे, तर बचत गटांतील प्रत्येक महिलेने स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, यावरही विशेष भर दिला आहे. मेघना शेतीसह कुक्कुटपालन व्यवसाय, प्रक्रिया व्यवसायाबरोबर गारमेंट व्यवसायातून उत्पन्न मिळवत आहेत.
खरीप हंगामात काही क्षेत्रावर भात लागवड, तर वीस गुंठे क्षेत्रावर झेंडू लागवड त्या करीत आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी हंगामात फुले विक्रीला येतील, या पद्धतीने लागवडीचे नियोजन केले आहे. एका क्षेत्रावर १४००, तर दुसऱ्या क्षेत्रावर १८०० झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. गणेशोत्सव नवरात्र, दसरा या सणांच्या वेळी नवरात्र, दसरा या सणांच्या वेळी फुलांची चांगली विक्री झाली. दिवाळी तसेच मार्गशीर्षापर्यंत फुले विक्रीसाठी उपलब्ध होतील, या पद्धतीने नियोजन केले आहे. भात काढल्यानंतर मिरची, वांगी, टोमॅटो, मुळा, माठ, मेथील, चवळी, पालक, भेंडी, काकडी, दोडकी, पडवळ, भोपळा, दुधी भोपळ्याची लागवड करीत आहेत. भाज्यांची विक्री शेतावरच होत आहे. दर्जा चांगला असल्याने व किफायतशीर दरात उपलब्ध होत असल्याने विक्रीसाठी फारशी तसदी घ्यावी लागत नाही.
शेतीसह कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. सुरुवातीला लेअर पक्षी होते. सध्या मात्र गावरान कोंबड्या ठेवल्या आहेत. कोंबड्या, अंडी व विष्ठाही विकून त्या उत्पन्न मिळवत आहेत. मेघना उत्तम शिवणकाम करतात. त्यामुळे गारमेंट व्यवसायही सुरू केला आहे. याशिवाय लोणचे, पापड तयार करून विक्री करतात. तांदूळ, नाचणीचे पापड तयार करीत आहेत. त्यांच्याकडील लोणचे, पापड उत्तम दर्जेदार असल्याने मागणीही अधिक होत आहे. शेतीच्या कामात मेघना यांचे पती मंगेश यांचे त्यांना सहकार्य लाभत आहे. शेती व पूरक व्यवसायावर त्यांच्या संसाराचा गाडा चालत आहे. मुलगा नववीत व मुलगी सातवीत शिकत आहे.
मेघना यांना शेतीची आवड असल्याने विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत. लागवडीसाठी बियाणे, रोपे खरेदीसह, पाणी, खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यामुळे त्यांच्याकडील भाजीपाला, भात, झेंडू उत्पादनाचा दर्जा चांगला आहे. झेंडूची रोपे थेट इस्लामपूर येथून मागवत आहेत. स्थानिक बाजारपेठेत फुलांना चांगली मागणी आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून लागवड केली तर चांगला पैसा मिळतो, असे मेघना यांनी सांगितले. ठिबक सिंचन पद्धतीमुळे पाण्याचा अपव्यय होत नाही. शिवाय पिकांना चांगला पाणीपुरवठा होतो.झेंडू लागवड फायदेशीरझेंडूच्या फुलांना चांगली मागणी असल्याने लागवडीसाठी मेघना नियोजन करीत आहेत. दोन टप्प्यांत लागवड करीत असल्याने गणेशोत्सव ते मार्गशीर्षापर्यंत झेंडू विक्रीसाठी उपलब्ध होतो. केशरी, पिवळा झेंडू लागवड केली असून, लागवडीसाठी लागणारी रोपे थेट इस्लामपूर येथील नर्सरीतून मागविली आहेत. जमिनीची नांगरणी करून रोपांची लागवड केली असून, नंतर रोपांना खत, मातीचे पूरन भरल्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली असून फुलांनी बहरली आहेत.
गुढेकर दाम्पत्याचे कष्टमेघना व त्यांचे पती मंगेश शेतीच्या कामात सतत राबत असतात. जमिनीची मशागत, लागवड, खत, पाणी व्यवस्थापन, काढणी विक्रीसाठी योग्य नियोजन करीत असल्यानेच त्यांनी यश मिळविले आहे. कोंबड्यांसह अंड्यांनाही चांगली मागणी आहे. शिवाय विष्ठेचा खत म्हणून वापर केला जात असल्यामुळे विष्ठेची विक्री चांगली होत आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्नाचा मार्ग गुढेकर दाम्पत्याने शोधला असून, त्यामध्ये समाधानी आहेत.
गारमेंट व्यवसायएकीकडे शेती कुक्कुटपालन व्यवसायासह गारमेंट व्यवसायही करीत आहेत. शिवणकामाची आवड असल्याने शिवणकाम करण्यासह रेडिमेड कपडे विक्री व्यवसायावर भर दिला आहे. निव्वळ शेतीतून उत्पन्न मिळविण्यापेक्षा त्याला जोडव्यवसाय सुरू केले आहेत. कामाचे नियोजन केले तर नक्की वेळ काढता येतो. लोणचे, पापड तयार करून विक्री सुद्धा मेघना करीत आहेत. तांदळासह नाचणी, पापडांना विशेष मागणी होत आहे. स्वतः विक्री करीत असल्यामुळे ग्राहकांकडून खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.
आर्थिक दिशामेघना गुढेकर यांनी गावातील ११ महिला गटांतील सदस्यांना आर्थिक विकासाची दिशा दिली. उमेद अभियानांतर्गत महिला स्वयंसाहाय्यता समूहांना शासनाने बळ दिल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना विविध व्यवसायांतून उत्पन्नाचे साधन मिळू लागले आहे. चिपळूण तालुक्यातील अष्टविनायक स्वयंसाहाय्यता समूह मिरवणे गटांतर्गत मेघना गुढेकर या शेतीपूरक जोडधंदा करीत आहेत. भात लागवडीसह झेंडू लागवड तसेच कुक्कुटपालन व्यवसायातून उत्पन्न मिळवत आहेत.