रविंद्र शिऊरकर
वडिलांनी सुरु केलेल्या हॉटेल ला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाची सांगड घालत छत्रपती संभाजीनगरचे बापू जाधव दुध व्यवसायातून महिन्याकाठी एक लाख रुपयांची उलाढाल करत आहे. कमीत कमी गायींमध्ये अधिक दुध मिळवत आणि दुष्काळग्रस्त भागातील असूनही योग्य चारा व्यवस्थापन करत त्यांनी व्यवसाय यशस्वी केला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर तालुका वैजापूर येथील शेतकरी बापू जाधव यांचे गावातच वडिलांनी सुरु केलेले हॉटेल आहे. दिवसभर तिथे रहायचं सोबत मजुरांच्या मदतीने शेती राखायची असा कित्येक वर्षांचा त्यांचा नित्यनेम. मात्र, यात कुठेतरी बदल करावा आणि हॉटेलला दूध पुरवठा करत त्यासोबत गाईंचा चारा पाण्याचा खर्च निघावा या हेतूने त्यांनी २०२२ मध्ये दोन FH गाईंची खरेदी केली. पुढे हळूहळू एक एक वाढवत आज एकूण 7 गाई बापू जाधव यांच्याकडे आहे.
चाऱ्यासाठी पशुपालकांची वणवण भटकंती, टंचाईची झळ त्यात दुध व्यवसायाला फटका
गाईंसाठी जाधव यांनी ६५ फूट लांब २८ फूट रुंद शेड केला असून त्यात गाईंचा मुक्त संचार असतो. सकाळी ५ ते ७ आणि पुन्हा रात्री ५ ते ७ असं गोठ्याचं कुट्टी मशीन आणि मिल्किंग मशीनच्या मदतीने काम चालतं. बापू जाधव यांना पत्नी रोहिणी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे ते सांगतात.
कमी गाईंद्वारे अधिक दूध उत्पादन
जाधव यांच्या कडील सात गाईंमध्ये ३ गाई या गाभण असून त्यांच्या पासून अल्प दूध उत्पादन तर ४ गाई पूर्णपणे दुधावर आहेत. सध्या दिवसाकाठी ९५ ते १०५ लिटर दुध उत्पादन होत असून गावातील संकलन केंद्रात जाधव हे दूध विक्री करतात. ३.५ फॅट तर ८.५ एस एन एफ ला २७ ते २८ दर मिळत असून सरासरी २७०० ते ३००० रुपये दूध विक्री तुन दररोज जाधव यांना मिळतात. जाधव यांच्या कडील सर्व गाई या उच्च दूध उत्पादन करणाऱ्या गाई असून एक गाय २०-२५ लिटर दुध प्रति दिवस देते.
परराज्यातील म्हैस खरेदीसाठी 'गोकुळ'चे ४० हजार अनुदान
गाईंचे चारा व्यवस्थापन
जाधव यांच्या कडील गाईंना वैरणीत मुरघास मुख्य चारा म्हणून असतो. त्याकरिता १३ ते १४ एकर मका चिक अवस्थेत असताना त्यापासून कुट्टी करून मुरघास बोध (गोणी) भरला जातो. वर्षभर पुरेल एवढा मुरघास साठवला जातो. सोबतचं हिरवी वैरण देण्यासाठी दोन एकर क्षेत्रांत नेपियर गवताची लागवड केलेली आहे. सोबतच सकाळ संध्याकाळ सरकी पेंड आणि गोळी पेंड सुग्रास यांची आंबवन दिली जाते.