दूध व्यवसाय हा शेतीचा जोडधंदा म्हणून केला जात होता. परंतु, आता तो दुय्यम व्यवसाय न राहता प्रमुख व्यवसाय बनला आहे. दुग्ध व्यवसाय आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. दुग्ध व्यवसायाने ग्रामीण अर्थकारणच बदलून त्याचा आर्थिक स्तर उंचावला आहे आणि त्याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गाव.
लाखेवाडीला इंदापूरचीदूधपंढरी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जवळपास सात हजारच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या लाखेवाडीमध्ये प्रतिदिन ५० ते ५५ हजार लिटर दूध उत्पादन होते. म्हणजे जवळ जवळ साडेचौदा ते पंधरा लाख रुपयांची प्रतिदिन दूधविक्री या गावात होते.
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दूध संकलन लाखेवाडी गावामध्ये होते. गावामध्ये एकूण २४ ते २५ दूध डेअरी दूध संकलन केंद्रे आहेत. संकलन केलेले दूध विविध संघांत दिले जाते. दूध डेअरी चालक उत्पादक जनावरांचे खाद्य, पेंड घरपोच पाठवायची सोय करतात.
जनावरांना हिरवा चारा, वैरण याबरोबरच ९० ते ९५ टक्के लोक मुरघास तयार करून ठेवतात. त्यामध्ये मका, कडवळ, गिनीगवत, ऊस, मेथी घास या चाऱ्याचा समावेश होतो. आधुनिकतेकडे तरुणाईचा कल असल्याने चाऱ्यासाठी ट्रॅक्टर, कुटी मशीन, धार काढणे मशीन, स्वच्छतेसाठी एचटीपी मोटरचा वापर करतात.
जनावरांचे वेळेवर लसीकरण, योग्य औषधोपचार दूध व्यावसायिक करतात. कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रत्येकाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे शिक्षित तरुणवर्ग नोकरी करण्यापेक्षा आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर दूध व्यवसाय करण्याकडे वळला आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठी छावणी येथे होते. ज्यामध्ये जवळ जवळ साडेतीन हजार जनावरे होती. छावणी करण्यात आली असली, तरी व्यवसायामध्ये खंड पडू दिला नाही.
अशी ही लाखेवाडी इंदापूरची दूधपंढरीच आहे. या दूधपंढरीसाठी शासनाकडून दूध व्यावसायिकांना योग्य तो हमीभाव मिळाल्यास लाखेवाडी पुणे जिल्ह्यातच नाही, तर महाराष्ट्रात दूध उत्पादनात अव्वल आल्याशिवाय राहणार नाही.
उदय देशमुख
लाखेवाडी
अधिक वाचा: गाई-म्हैशी वेळेवर माजावर येत नाहीत; काय असतील बर कारणे